पिंपळे गुरव: संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन, वल्लभनगर एसटी बसस्थानकाजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे. यामुळे मेट्रो स्टेशन आणि वल्लभनगर एसटी आगारात ये-जा करणाया नागरिकांना तसेच वाहनचालक, पादचार्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संबंधित विभागाने येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
उद्योगनगरीतील बहुतांश रस्त्यांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असल्याचे चित्र दिसून आले. सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. रहदारीच्या मार्गावर पाणी साचून राहत असल्याने पादचारी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. (Latest Pimpri News)
सखल भाग आणि रस्त्यांवर जागोजागी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहनचालक, कामगार आणि नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच संत तुकारामनगर येथे मेट्रो स्टेशनच्या शेजारी भर चौकात पाणी साचले आहे. मेट्रो स्टेशनकडे तसेच एसटी बसस्थानकाकडे जाणार्या प्रवाशांना साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. अनेकदा चार चाकी, दुचाकी तसेच इतर वाहने येथून प्रवास करताना साचलेले पाणी पादचार्यांच्याअंगावर येत आहे.
यामुळे मेट्रो, एसटी तसेच विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेकदा वाहनचालक व पादचारी यांच्यात वाद उद्भवत आहेत.उद्योगनगरीतून पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे मेट्रोची प्रवासीसंख्या वाढत आहे. मेट्रोकडून सोयीसुविधा मिळत असल्याने प्रवासी संख्येत वाढ होत आहे. परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील रस्ते, नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा यांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
मेट्रोतून प्रवास करणार्या नागरिकांनादेखील या साचलेल्या पाण्याचा अडथळा पार करावा लागत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करावी.
चेंबरमुळे अपघाताचा धोका
महापालिकेच्या वतीने शहरात पडणार्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी स्ट्रॉर्म वॉटरलाईन टाकली आहे. परंतु, रस्त्याचे काम करताना या स्ट्रॉर्म वॉटरलाईनच्या चेंबरकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक ठिकाणी चेंबर रस्त्यापेक्षा उंचीवर आहेत. तसेच रस्त्याचा उतार आणि स्ट्रॉर्म वॉटरलाईन चढावर राहत असल्याने रस्त्यातील पाण्याचा निचरा होत नाही. संत तुकाराम नगर येथे पाण्याचा निचरा होण्यासाठी येथील चेंबरचे झाकण काढून टाकले आहे. या रहदारीच्या मार्गावरील चेंबरचे झाकण काढून टाकल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
थोडा जरी पाऊस पडला तरी तेथे पाणी साचून राहते. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. पावसाचे पाणी वाहून नेण्याची व्यवस्था नीट नसल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी.- अॅड. मोहन अडसूळ, स्थानिक.
चेंबरचे झाकण बसविण्याची व्यवस्था तात्काळ केली जाईल. पाण्याचा निचरा होण्यासाठी स्ट्रॉर्मवॉटर लाईनचे काम सुरू आहे. पावसामुळे थोडे काम थांबले आहे. अर्धे लाईनचे काम झालेले आहे. तरी उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल.- सुनील पवार, कार्यकारी अभियंता, बीआरटीएस विभाग.