पिंपरी: डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या पाण्यात होत असल्यामुळे आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन साठविलेल्या पाण्याची तपासणी केली जाते. मात्र, प्रशासनाकडून शहरातील बांधकामे किंवा इतर पाण्याच्या स्त्रोतामुळे साचलेल्या पाण्याच्या डबक्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. ही मोठंमोठी डबकी ही डासोत्पत्तीची केंद्रे बनली आहेत.
दरवर्षी डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णांची संख्या पावसाळ्यात वाढत असते. याबाबत प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात आरोग्य विभाग कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाच्या पाण्याची डबकी, कचर्याचे ढीग यामुळे डासांच्या उत्पत्तीला चालना मिळते. पावसामुळे डबक्यांची संख्या वाढली आहे. (Latest Pimpri News)
प्रशासनाचे दुर्लक्ष
पावसाळ्यात डेंग्यू व मलेरिया या आजारास प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभागाने या डबक्यामध्ये गप्पी मासे सोडणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाकडून घरांची तपासणी, कंटेनर तपासणी, भंगार दुकानांची तपासणी, औषध फवारणी सुरू आहे.
डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सध्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविल्याचे सांगत आहे. मात्र, अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे आरोग्य विभागाचे सर्वेक्षण कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहे.
शहरात वाढणार्या कीटकजन्य आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाने प्रतिबंधक उपाययोजना करण्याची गरज आहे. शहर परिसराची स्वच्छता आणि प्रतिबंधक उपाययोजना वर्षभर राबविल्यास डासांच्या निर्मितीलाही पायबंद बसेल, अशी मागणी नागरिक करत आहेत.
साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी
मोशी रिव्हर रेसिडेन्सी सोसायटीजवळील मोकळ्या जागेत पाण्याची डबकी साचली आहेत. तसेच, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. याठिकाणी लोकवस्तीजवळ मोठ्या प्रमाणात पाण्याचे डबके तयार झाली आहेत. डबक्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण वाढले आहे. चिखली प्राधिकरण येथे पदपथावर कचरा अनेक दिवसांपासून पडून आहे. सांगवी नदीघाटावर कचरा साचला आहे व गवत झाड-झुडपे वाढली आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यात पाणी साचून राहत आहे.