Wakad Snake Rescue Pudhari
पिंपरी चिंचवड

Wakad Snake Rescue: वाकडमध्ये साडेचार फुटी नागिणीसह १४ पिल्लांचे यशस्वी रेस्क्यू; नैसर्गिक अधिवासात सुरक्षित मुक्तता

मातृत्वात दोन महिने अंड्यांचे संरक्षण केल्यानंतर नागिणीची पिल्लांसह सुटका; नागरिकांना सर्प आढळल्यास तज्ज्ञांना संपर्क करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: वाकड परिसरात १४ पिल्लांसह साडेचार फुटी नागिणीचे यशस्वी रेस्क्यू करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सुखरूप मुक्त करण्यात आले. ही उल्लेखनीय कामगिरी वर्ल्ड फॉर नेचर संस्थेचे प्राणिरक्षक सोमनाथ घुंगुर्गे यांनी पार पाडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नागिणीने अंडी दिल्यानंतर सुमारे दोन महिने त्यांचे संरक्षण केले. या काळात ती एकाच ठिकाणी राहून अंड्यांवर लक्ष ठेवत होती. मातृत्वाची जबाबदारी पार पाडताना ती अन्न-पाण्याची पर्वा न करता अंड्यांचे रक्षण करत असल्याचे आढळून आले. अंड्यातून १४ निरोगी पिल्ले बाहेर आल्यानंतर सोमनाथ घुंगुर्गे यांनी नागिणीसह सर्व पिल्लांचे सुरक्षित रेस्क्यू केले.

त्यानंतर त्यांना मानवी वस्तीपासून दूर असलेल्या योग्य नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वर्ल्ड फॉर नेचर संस्थेने नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्याच्या काळात सापांची पिल्ले मोठ्या प्रमाणात जन्माला येत असल्याने अधिक सतर्कता बाळगावी.

घराच्या परिसरात किंवा शेतात साप अथवा सापाची पिल्ले आढळल्यास त्यांना इजा न करता तात्काळ प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन्यजीव बचाव संस्थेशी संपर्क साधावा. वन्यजीव संवर्धन आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अशा प्रकारचे बचावकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे संस्थेने सांगितले.

आपल्या परिसरात साप आढळल्यास घाबरून न जाता किंवा त्याला इजा न करता तात्काळ जवळच्या अधिकृत प्राणीमित्र किंवा सर्पमित्राशी संपर्क साधावा. संबंधित व्यक्तीकडे वैध ओळखपत्र असणे आवश्यक आहे. वन्यजीव योग्य आणि प्रशिक्षित हातात देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या एका योग्य निर्णयामुळे एखाद्या प्राण्याचा जीव वाचू शकतो आणि मानव-वन्यजीव संघर्षही टाळता येऊ शकतो."
शुभम पांडे (अध्यक्ष, वर्ल्ड फॉर नेचर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT