Women Harassment Case Pudhari
पिंपरी चिंचवड

Wakad News: सह्यांचा राग, पैशांचा तगादा अन् विवाहितेचा मृत्यू; पतीसह सासू-सासरा, दीरही अटकेत

सखोल चौकशीची माहेरच्यांकडून मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: माहेरच्या वडिलोपार्जित मालमत्तेत हिस्सा आणि पैशांच्या मागणीसाठी सातत्याने शारीरिक व मानसिक छळ होत असलेल्या ४२ वर्षीय विवाहितेचा वाकड येथे संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २७) पहाटे उघडकीस आली.

विवाहितेने बेडरूममधील सीलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे पतीकडून सांगण्यात आले. मात्र, दरवाजा उघडा असताना तिने गळफास घेतल्याचे सांगितले जात असल्याने मृत्यूबाबत संशय व्यक्त करीत माहेरच्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

शिल्पा सचिन गवारे (वय ४२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचा भाऊ संतोष गुलाब कलाटे (४७, रा. दत्त मंदिर रोड, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती सचिन उत्तम गवारे, सासरा उत्तम शिवराम गवारे, सासू संजीवनी उत्तम गवारे आणि दीर संदीप उत्तम गवारे यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पाचा विवाह सचिनसोबत २००९ मध्ये झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. लग्नानंतर सुरुवातीला तिला चांगली वागणूक मिळाली. मात्र, त्यानंतर पैशांसाठी तिचा छळ सुरू झाला.

सचिनला दारूचे व्यसन असून, तो नशेत तिला मारहाण करीत होता. तसेच, शिल्पा घराबाहेर गेल्यानंतर तिच्याबाबत संशय घेऊन पतीचे कान भरले जात आणि त्यानंतर तिला मारहाण होत असल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.

मृत शिल्पा वाकडच्या नगरसेविका स्नेहा कलाटे यांची नणंद होती. भाजपचे पदाधिकारी संतोष कलाटे यांची ती लहान बहीण होती. शिल्पाच्या मृत्यूमुळे वाकडसह पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.

भावाला सह्या दिल्यानंतर छळ वाढला

माहेरच्या मालमत्तेत हिस्सा मिळविण्यासाठी शिल्पावर दबाव टाकला जात होता. तू तुझ्या बापाकडून जमिनीत हिस्सा घे. आम्हाला तुझ्या बापाची प्रॉपर्टी पाहिजे. आम्हाला विचारल्याशिवाय भावांच्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवर सह्या करू नकोस, असे सांगून तिला त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.

काही दिवसांपूर्वी शिल्पाने सासरच्या मंडळींना न सांगता माहेरच्या मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रांवर भावांच्या बाजूने स्वाक्षऱ्या केल्या. ही बाब समजल्यानंतर सासरच्या मंडळींनी त्याचा राग धरून तिचा जास्त छळ केल्याचा दावा संतोष कलाटे यांनी केला आहे.

बहिणीच्या छळाची माहिती मिळाल्यानंतर अनेकदा तिच्या घरी जाऊन पती व सासरच्या मंडळींची समजूत काढली. त्यांच्या मागणीनुसार वेळोवेळी रोख रक्कम दिली. तसेच, व्यवसाय आणि प्लॉट खरेदीतही मदत केली. तरीही बहिणीचा छळ थांबला नसल्याचे कलाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

माहिती लपवून ठरवले लग्न

शिल्पाच्या विवाहापूर्वी सचिन व त्याचा भाऊ एका खून प्रकरणात आरोपी होते. ही बाब लग्नाच्यावेळी माहेरच्यांपासून लपविण्यात आली होती, असा दावाही फिर्यादी यांनी केला आहे. लग्नानंतर संबंधित प्रकरणात सचिनला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि तो सुमारे चार वर्षे कारागृहात होता, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या आठवणी ताज्या

या घटनेमुळे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. कस्पटेवस्ती, वाकड माहेर असलेल्या वैष्णवीचा मे २०२५ मध्ये मुळशीतील भुकूम येथील सासरी मृत्यू झाला होता. माहेरच्यांनी हुंडा आणि पैशांसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते.

पतीसह सासरच्या मंडळींना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा वाकड परिसरातील विवाहितेच्या मृत्यूमध्ये माहेरच्या मालमत्तेत हिस्सा आणि पैशांसाठी छळाचा आरोप झाल्याने प्रकरण चर्चेत आले आहे. दरम्यान, शिल्पाचा मृत्यू नेमका कसा झाला, मृत्यूपूर्वी पती-पत्नीमध्ये काय

घडले आणि माहेरच्यांनी व्यक्त केलेल्या संशयात तथ्य आहे का, हे पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.

भावाला फोन अन् कुटुंबीयांची धावपळ

गुरुवारी रात्री एकच्या सुमारास शिल्पाचा दीर संदीप याने तिचा भाऊ रणजित याला फोन केला. शिल्पा आणि सचिन यांच्यात भांडण झाले असून, तिला काळेवाडी फाटा येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आणल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर माहेरचे नातेवाईक धावपळ करत तातडीने रुग्णालयात पोहोचले. तेथे डॉक्टरांनी शिल्पाला मृत घोषित केले होते. शिल्पाने बेडरूममधील सीलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे सचिनने डॉक्टरांना सांगितले.b

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
- विठ्ठल साळुंखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT