वडगाव मावळ: वडगाव नगरपंचायतच्या आगामी पाच वर्षांसाठी नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून कोणाकोणाला संधी मिळणार, याचा फैसला उद्या रविवारी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेतून होणार असून, नगरपंचायतवर भाजपचा झेंडा फडकणार की राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार, याचीच उत्सुकता लागली आहे. नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक आहे. पहिला पंचवार्षिक काळ संपल्यानंतर गेली दोन वर्षे नगरपंचायतमध्ये प्रशासकीय कारभार सुरू होता. त्यामुळे तब्बल सात वर्षांनी होत असलेल्या नगरपंचायतच्या या सार्वत्रिक निवडणुकीला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे आणि राजकीयदृष्ट्या ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे.
अनेक ठिकाणी तिरंगी लढत
नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या 17 जागांसाठी प्रामुख्याने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ लढत झाली असून, काही प्रभागांमध्ये अपक्षांच्या उमेदवारीमुळे तिरंगी लढत झाली. बहुतांश ठिकाणी मोठ्या घराण्यांचे उमेदवार समोरासमोर असल्याने भावकी भावकीत तर काही ठिकाणी दोन भावकीमध्ये लढत झाल्याने या निवडणुकीसाठी सर्वांनीच जोर लावला होता.
निकालाकडे सर्वांचे लक्ष
त्यामुळे वडगाव नगरपंचायतच्या निवडणुकीला अनन्य साधारण महत्त्व आले असून, सर्वच उमेदवारांनी शहरात वास्तव्य असलेले मतदार व शहराबाहेर स्थलांतर झालेले मतदार यांच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. याशिवाय मतदारांना ’लक्ष्मी’ दर्शन ही मोठ्या प्रमाणात झाले व पर्यायाने मतदानाचा टक्काही वाढला. त्यामुळे उद्या होणाऱ्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
पुन्हा राष्ट्रवादी की कमळ फुलणार ?
यापूर्वीच्या पंचवार्षिक कालावधीत नगरपंचायतमध्ये भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 7, दोन अपक्ष व एक मनसे असे संख्याबळ होते. नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर राष्ट्रवादीचे 7, एक अपक्ष व मनसे एक अशी सत्ता होती. त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा सत्ता राखणार की भाजपचे कमळ फुलून सत्ता परिवर्तन होणार, याची उत्सुकता आहे.
प्रभागनिहाय मतमोजणी फेऱ्यांचा तपशील
प्रभाग क्रमांक 1, 2 व 12 : चार फेऱ्या
प्रभाग क्रमांक 3, 4, 6, 7 व 11 : पाच फेऱ्या
प्रभाग क्रमांक 8, 9 व 13 : सहा फेऱ्या
तसेच, 2 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या प्रभाग क्रमांक 5 अ व 10 ब येथील मतदानासाठी चार फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. त्यानंतर 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या प्रभाग क्रमांक 5 ब व 10 अ येथील मतदानासाठी त्याच टेबलवर चार फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली असून, निकालाकडे सर्वच उमेदवार व मतदारांचे लक्ष लागले आहे.
नांगरगाव, गवळीवाडा प्रभागातील प्रत्येकी 1 जागेसाठी आज मतदान
लोणावळा नगर परिषदेच्या नांगरगाव प्रभागातील 5 (ब) सर्वसाधारण जागा व गवळीवाडा प्रभागातील 10 (अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रत्येक 1 जागेसाठी शनिवारी (20 डिसेंबर) मतदान होणार आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपच्या उमेदवारांच्याविरोधात प्रतिस्पर्धी उमेदवारांनी हरकती घेतल्या होत्या. मात्र, या हरकती न्यायालयाचे फेटाळून लावल्या आहेत. असे असले तरी या न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. नांगरगाव या प्रभागात भाजपचे सुभाष डेनकर व राष्ट्रवादी काँग््रेासचे मुकेश परमार यांच्यात लढत होणार आहे. तर, गवळीवाडा येथे भाजपच्या अश्विनी जाधव व काँग््रेासच्या वैशाली मोगरे यांच्यात लढत होणार आहे.