लोणावळा: विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या एका १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाय घसरून पडल्याने ती गंभीर जखमी झाल्याची घटना आज (२६ जुलै) दुपारी घडली. 'शिवदुर्ग मित्र' रेस्क्यू टीम, लोणावळा ग्रामीण पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे व अथक प्रयत्नांमुळे जखमी मुलीला सुखरूप खाली आणून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सातारा येथील रहिवासी व सध्या आकुर्डी येथील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी कु. प्रीती जाधव (वय १९) ही तिच्या ९ ते १० मित्र-मैत्रिणींसोबत विसापूर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आली होती. गड फिरत असताना भातराशीच्या बाजूच्या बुरुजाच्या अलीकडे तलावाजवळ तिचा अचानक पाय घसरला आणि ती खाली पडली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे ती गडावरच बेशुद्ध झाली.
घटनेचे गांभीर्य ओळखून तिच्या मित्रांनी दुपारी १:०५ वाजता तात्काळ 'शिवदुर्ग रेस्क्यू टीम'शी संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच शिवदुर्गच्या ग्रुपवर संदेश देण्यात आला आणि सदस्यांनी क्षणाचाही विलंब न लावता रेस्क्यू साहित्याची जमवाजमव केली. गडावरील एका डॉक्टरने प्रीतीला पाठीच्या कण्याला (Spine Injury) दुखापत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार टीमने विशेष 'स्पाईन स्ट्रेचर'ची व्यवस्था केली आणि दोन वाहनांतून विसापूर किल्ल्याच्या दिशेने कूच केले.
दुपारी २:३० वाजता शिवदुर्गची टीम जखमी प्रीतीजवळ पोहोचली. तिची प्राथमिक तपासणी करून, तिला अत्यंत काळजीपूर्वक स्पाईन स्ट्रेचरवर घेण्यात आले. गडावर सुरू असलेला मुसळधार पाऊस, दाट धुके आणि दगड-धोंड्यांवर पसरलेल्या शेवाळामुळे रस्ता अत्यंत निसरडा झाला होता. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिवदुर्गचे सदस्य, प्रीतीचे मित्र आणि स्थानिक नागरिकांनी हातात हात घालून, दगडधोंड्यांच्या अवघड मार्गावरून तिला हळूहळू खाली आणण्यास सुरुवात केली.
क्षणाचीही विश्रांती न घेता टीमने जखमी प्रीतीला सुरक्षितपणे खाली उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेर्यंत पोहोचवले आणि तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. या अत्यंत खडतर बचाव मोहिमेत शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या समन्वयामुळे एका तरुणीचे प्राण वाचण्यास मदत झाली. या मोहिमते शिवदुर्गचे सागर कुंभार, सागर दळवी, सचिन शिंदे, योगेश दळवी, राजेश ठाकर, अनिकेत आंबेकर, वैष्णवी भांगरे, आदिती गायकवाड, सुरज गायकवाड, गौरव कालेकर, यश सोनवणे, महादेव भवर, योगेश उंबरे, विशाल पिसे, अभिजीत बोरकर, रोहित नागीने, नितीन कुमार साहेब, पिंटू मानकर व दिनेश गोरे या सदस्यांनी या मोहिमेत मोलाचे योगदान दिले.