Vallabhnagar Underpass Pudhari
पिंपरी चिंचवड

Vallabhnagar Underpass: वल्लभनगर भुयारी मार्ग देतोय अपघाताला निमंत्रण

खड्डे, उघडे चेंबर्स, राडारोड्यामुळे भुयारी मार्गाची दुरवस्था

पुढारी वृत्तसेवा

वल्लभनगर: शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. वल्लभनगर येथील भुयारी मार्गात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने प्रशासनाने हा मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद केला होता.

पाण्याचा उपसा करून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, पाणी ओसरल्यानंतर या भुयारी मार्गाची दुरवस्था समोर आली असून, मोठमोठे खड्डे, उघडी पडलेले चेंबर्स आणि गाळाने तुंबलेले पावसाळी नाले यामुळे हा मार्ग अपघातांना निमंत्रण देत आहे.

पावसाच्या पाण्यामुळे भुयारी मार्गातील डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडला असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर खडी व माती पसरल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. थोडा पाऊस झाला तरी भुयारी मार्गात पाणीच पाणी होते. विशेषतः दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांना खड्डे चुकविताना वाहनावरील ताबा सुटण्याची शक्यता आहे.

भुयारी मार्गाच्या कडेला असलेल्या पावसाळी पाणी वाहून जाणाऱ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.

त्यामुळे पुन्हा पाऊस झाल्यास पाण्याचा निचरा सुरळीत होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच काही ठिकाणी पावसाळी चेंबरची झाकणे गायब झाली आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ही उघडी ठिकाणे वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.

प्रशासन अपघाताची वाट पाहत आहे का?

पाणी साचल्यावर भुयारी मार्ग बंद केला जातो आणि पाणी ओसरल्यानंतर उखडलेल्या रस्त्यावरून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर येते. खड्डे चुकविताना वाहने घसरतात. रात्रीच्या वेळी उघडी चेंबर्स दिसत नाहीत. प्रशासन एखादा मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का?' असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे.

तातडीने उपाययोजनांची मागणी

  • भुयारी मार्गातील खड्ड्यांचे तातडीने डांबरीकरण किंवा पॅचवर्क करावे.

  • गायब झालेल्या पावसाळी चेंबरवर नवीन झाकणे बसवावीत.

  • नाल्यांमधील गाळ काढून पाण्याचा निचरा सुरळीत करावा.

  • अपघात होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करावी.

वल्लभनगर भुयारी मार्गातील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, काही खड्डे बुजविण्यात आले आहेत तसेच भुयारी मार्गातील गाळ काढण्यासाठी आरोग्य विभागाला कळविण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून लवकरच गाळ काढण्याचे काम सुरू केले जाईल.
- राहुल जन्नू, उपअभियंता, स्थापत्य विभाग, मनपा.
पावसाचे पाणी ओसरल्यानंतरही नाल्यांमधील गाळ काढलेला नाही. पुन्हा पाऊस आला तर मार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. रात्री उघडी चेंबर्स दिसत नाहीत. खड्डे आणि चेंबर्समुळे वाहनांचे नुकसान होत आहे. तातडीने झाकणे बसवून रस्ता दुरुस्त करावा.
- शुभम यादव, सामाजिक कार्यकर्ता, वल्लभनगर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT