Vallabhnagar Depot Reservation Rush Pudhari
पिंपरी चिंचवड

Vallabhnagar Depot Reservation Rush: वल्लभनगर आगारात आरक्षणासाठी गर्दी; सोयीअभावी प्रवासी त्रस्त

उन्हाळी सुट्ट्यांमुळे तिकीट बुकिंगसाठी झुंबड; पाणी व बसण्याच्या सुविधांचा अभाव

पुढारी वृत्तसेवा

उमेश सणस

पिंपळे गुरव: उन्हाळ्याच्या सुट्‌‍ट्यांची चाहूल लागताच गावी जाणाऱ्या प्रवाशांची लगबग वाढली आहे. पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारात आरक्षण काउंटरवर गर्दी वाढल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या मार्गांवरील बससेवांसाठी तिकीट बुकिंग करण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडत असून, आरक्षण खिडकीपुढे गर्दी होत आहे. परंतु बुकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सुटीत गावी जाणे हा नागरिकांचा मनस्ताप ठरत आहे.

शाळा व महाविद्यालयांना सुट्या लागल्याने चाकरमानी विद्यार्थी आणि कुटुंबांसह प्रवासी मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी जाण्यासाठी आगारात दाखल होत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज 300 ते 400 तिकिटांचे बुकिंग होत असून, आतापर्यंत अंदाजे दोन लाख रुपयांहून अधिकची उलाढाल झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत असतानाही प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा अपुऱ्या पडत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

सोयीसुविधांचा अभाव

वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आगारात पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था आणि बसण्याची सोय नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह आलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे किंवा कोणतीही आसन व्यवस्था उपलब्ध नाही ही बाब प्रवाशांच्या तीव नाराजीचे मुख्य कारण ठरत आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊनही अतिरिक्त आरक्षण काउंटर सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे रांगा अधिकच लांबत चालल्या आहेत.

नियोजनशून्य कारभारामुळे प्रवाशांचा संताप

आरक्षणासाठी प्रवाशांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. तिकीट मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने प्रवाशांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढत आहे. आगाराच्या आवारात आरक्षण केंद्र असले तरी तासनतास ताटकळत उभे राहून तिकीट काढण्याची वेळ आल्याने अनेकांनी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महिला, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडेही उपलब्ध नाही. तासभर रांगेत उभे राहणे वयोवृद्धांना अशक्य होत आहे. प्रशासनाने किमान बसण्याची सोय तरी करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया एका संतप्त प्रवाशाने व्यक्त केली.

प्रशासनाकडून या उपाययोजनांची गरज

वल्लभनगर आगारातील सध्याची परिस्थिती पाहता वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत सुविधा अत्यंत अपुऱ्या असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू करणे, पिण्याच्या पाण्याची सोय करणे तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी पुरेशी आसन व्यवस्था (बाकडे) उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

अतिरिक्त खिडकीवर आरक्षणाची सुविधा केली जाणार आहे. सध्या प्रिंटर खराब असल्यामुळे तो दुरुस्तीसाठी दिला आहे. वॉटर कुलर बसवलेला आहे, मात्र तो अद्याप सुरू झालेला नाही. तो सुरू होईपर्यंत बाजूलाच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे.
वैशाली कांबळे, एसटी बसस्थानक प्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT