

पिंपरी: पुणे आणि पिंपरी- चिंचवडकरांची जीवनवाहिनी म्हणून पीएमपीची बससेवा ओळखली जाते; मात्र शहरातील विविध भागात शेडचा अभाव असल्याने प्रवाशांना रखरखत्या उन्हात उभे राहून बसची प्रतीक्षा करत थांबावे लागत आहे. वाढत्या तापमानात ही परिस्थिती आधिक गंभीर होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.
नोकरीनिमित्त तसेच कामानिमित्त अनेक नागरिक पीएमपी बसगाड्यातून प्रवास करतात. ही संख्या लाखोंच्या घरात आहे. प्रवासी संख्या मोठी असूनही अनेक ठिकाणी बसशेड नसल्याने नागरिक रणरणत्या उन्हात बसेसची वाट पहात उभे असल्याचे चित्र शहरातील पीसीएमसी चौक, आकुर्डी , भोसरी, तळवडे, भोसरी, निगडी, थेरगाव, डांगे चौक, लांडेवाडी इत्यादी ठिकाणी दिसून येते. तसेच काही ठिकाणी शेड शेडची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवासी झाड किंवा इमारतीच्या आडोशाला उभे राहून बसची प्रतीक्षा करतात.
शहरातील मेट्रो, रस्ते, किंवा बंद बीआरटीमुळे आधिकृत थांब्याऐवजी अन्य ठिकाणी बस थांबविण्यात येतात. त्यामुळे प्रवाशांना बसच्या मागे धावाधाव करावी लागत आहे. तसेच यावेळी अपघात होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, महिलांना बसत आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन तातडीने शेड उभाराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.