Aadhaar Registration Centre Pudhari
पिंपरी चिंचवड

Aadhaar Registration Centre: आधार केंद्रात नागरिकांची हेळसांड; ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांगांची मोठी गैरसोय

वल्लभनगर येथील बॅडमिंटन हॉल परिसरातील आधार केंद्रावर दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी येतात.

पुढारी वृत्तसेवा

वल्लभनगर: एकीकडे डिजिटल इंडियाचा गाजावाजा केला जात असताना, दुसरीकडे नागरिकांना अत्यावश्यक असलेल्या आधार सेवा केंद्रांवर मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याचे वास्तव वल्लभनगर येथे समोर आले आहे.

वल्लभनगर येथील बॅडमिंटन हॉल परिसरातील आधार केंद्रावर दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी येतात. मात्र, येथे बसण्याची व्यवस्था, पावसापासून संरक्षणासाठी शेड, प्रतीक्षागृह तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांची अक्षरशः हेळसांड होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. केंद्राबाहेर छत नसल्याने नागरिकांना पावसात भिजतच रांगेत उभे राहावे लागते. उन्हाळ्यातही उन्हाचा तडाखा सहन करत तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागते. लहान मुलांना कडेवर घेऊन आलेल्या महिलांपासून काठीच्या आधाराने चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

पिण्याच्या पाण्याची सोय नाही

आधार कार्ड हे आज बँकिंग व्यवहार, शासकीय योजना तसेच विविध सेवांसाठी अत्यावश्यक कागदपत्र बनले आहे. अशा महत्त्वाच्या केंद्रावर नागरिकांसाठी किमान सुविधा उपलब्ध नसणे ही प्रशासनाच्या नियोजनातील गंभीर त्रुटी असल्याची भावना

नागरिक व्यक्त करत आहेत. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अनेकदा दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागते. मात्र, बसण्यासाठी एकही बाक किंवा खुर्ची उपलब्ध नाही.

पावसापासून संरक्षणासाठी शेड नसल्याने ज्येष्ठ नागरिक महिला आणि दिव्यांगांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, पिण्याच्या पाण्याचीही कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांचा संताप व्यक्त होत आहे.

उपाययोजना करण्याची मागणी

आधार सेवा केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने आणि सुलभपणे सेवा मिळावी, यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता प्रशासन या गंभीर समस्येची दखल घेऊन त्वरित उपाययोजना करणार का याकडे वल्लभनगरकरांचे लक्ष लागले आहे.

आधार कार्ड प्रत्येक सरकारी कामासाठी आवश्यक आहे. आधार केंद्रात बसण्याची व्यवस्था नसल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. पिण्याचे पाणी, प्रतीक्षागृह आणि शेड या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, काही कर्मचारी नागरिकांशी उध्दटपणे वागतात. प्रशासनाने नागरिकांशी सुसंवादाने वागण्याबाबत कर्मचाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात.
- मोहन अडसूळ, स्थानिक नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT