वैष्णवीच्या आजोबांची प्रकृती खालावली pudhari photo
पिंपरी चिंचवड

Vaishnavi Hagawane: चारित्र्यावर शिंतोडे उडाल्याने वैष्णवीच्या आजोबांची प्रकृती खालावली; कस्पटे कुटुंबीय व्यथित

तिच्यावर होत असलेली बदनामी ही दुसऱ्यांदा मृत्यूसारखीच वेदना बनली आहे

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील न्याय- निवाड्याच्या पार्श्वभूमीवर तिच्या चारित्र्यावर उडवले जाणारे शिंतोडे हे केवळ अन्यायकारकच नाही, तर अत्यंत वेदनादायी आहेत. याचा तीव्र मानसिक परिणाम तिच्या कुटुंबीयांवर झाला आहे. ८० वर्षीय आजोबा साहेबराव कस्पटे हे या मानसिक धक्क्याने इतके व्यथित झाले की त्यांना शुक्रवारी सकाळी रुग्णालयात दाखल करावे लागले.

कुटुंबीयांच्या दुःखाला शब्द नाहीत...

वैष्णवीचे कुटुंबीय आधीच तिच्या आकस्मिक आणि क्रूर मृत्यूने हादरलेले असताना, तिच्यावर होत असलेली बदनामी ही दुसऱ्यांदा मृत्यूसारखीच वेदना बनली आहे. मोहन कस्पटे यांनी सांगितले की, “आम्ही केवळ तिच्या न्यायासाठी झगडत आहोत. तिच्या मृत्यूनंतरही लोक तिच्या चारित्र्यावर बोलत आहेत. हे खूप त्रासदायक आहे. माझ्या वडिलांना (वैष्णवीचे आजोबा) हे ऐकून जबरदस्त धक्का बसला आणि त्यांची तब्येत ढासळली.”

श्रीमंतांचं समर्थन, गरिबांचं चारित्र्यहनन?

कुटुंबीयांनी असा आरोप केला की, जेव्हा आरोपी धनदांडगे, प्रभावशाली असतात, तेव्हा त्यांच्या बाजूने खोट्या कथा रचल्या जातात, पण जेव्हा पीडित मुलगी सामान्य घरातील असते, तेव्हा तिच्या चारित्र्यावर बोट ठेवून लोक संवेदना हरवतात. “आमचं दुःख कळत नाही, पण तिच्या बदनामीवर चर्चासत्रं चालतात. हे अन्याय आहे,” अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

“न्याय मिळावा, पण सन्मानही जपला जावा” “आम्ही न्यायासाठी लढत आहोत. पण तिच्या सन्मानावर घाला घालू नका. तिने जे भोगलं, ते ऐकूनही हृदय थरथरत. तिच्या आत्म्याला शांती हवी, बदनामी नव्हे.
मोहन कस्पटे, (वैष्णवीचे चुलते)

सोशल मीडियावर काही मूठभर लोक वैष्णवीबाबत तथ्यहीन, अप्रामाणिक आणि तिच्या चारित्र्याला भोवळ आणणाऱ्या पोस्ट्सचा मारा करत आहेत. मुलीने प्रेमविवाह केला म्हणून तिला दोष देणे किंवा तिच्या आत्महत्येस कारणीभूत परिस्थितीऐवजी तिच्या वागणुकीवर प्रश्न उपस्थित करणे हे केवळ अमानवीयच नाही, तर तिच्या मृत्यूचा अवमान करणे आहे, असा संताप व्यक्त करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT