पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या फरार आरोपी निलेश चव्हाणची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी त्याच्या विरोधात 'स्टँडिंग वॉरंट' (Standing Warrant) जारी केले आहे. पोलिसांच्या अनेक प्रयत्नांनंतरही निलेश चव्हाण सापडत नसल्यामुळे न्यायालयाने हा कठोर आदेश दिला आहे.
जेव्हा एखादा आरोपी जाणीवपूर्वक आपली ओळख लपवून फरार राहतो, त्याला न्यायालयात हजर करणे कठीण होते, तेव्हा न्यायालय स्टँडिंग वॉरंट जारी करते. हा वॉरंट मिळाल्यानंतर पोलिस आरोपीच्या घराचे व मालमत्तेचे ठिकाण शोधून तेथे जाहीर उद्घोषणा करतात. जर, आरोपीने तरीही न्यायालयात आत्मसमर्पण केले नाही, तर त्याच्या स्थावर (जमिनी, घरे) आणि जंगम (वाहनं, मौल्यवान वस्तू) मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली जाते.
"आरोपी निलेश चव्हाण दीर्घकाळ फरार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्याविरोधात स्टँडिंग वॉरंट जारी करण्यात आले असून, लवकरच उद्घोषणा आणि जप्तीची प्रक्रिया सुरू होईल."
विशाल गायकवाड, पोलिस उपायुक्त, पिंपरी- चिंचवड
फरार असलेला निलेश चव्हाण वैष्णवी हगवणे प्रकरणात सहआरोपी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळेच पोलिसांनी न्यायालयात अर्ज करून स्टँडिंग वॉरंटची मागणी केली होती, जी मंजूर झाली आहे.
यापुढे पोलिस उद्घोषणा करणार, मालमत्तेची यादी तयार करणार आणि जप्तीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे निलेश चव्हाणवर कायदेशीरदृष्ट्या दबाव वाढणार असून, तो लवकरात लवकर हजर होण्याची शक्यता आहे.