Vaishnavi Hagawane Death
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने गळफास घेऊन जीवन संपवले. मात्र सुनेच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आले आहेत. यामुळे सासरच्या लोकांनी तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. वैष्णवी शशांक हगवणे (वय २४) असे जीवन संपवलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी वैष्णवी यांचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आली. पण राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हे दोघे अद्याप फरार आहेत. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई केली. राजेंद्र तुकाराम हगवणे (Rajendra Hagawane) आणि सुशील राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी जारी केला आहे.
वैष्णवीच्या वडिलांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्याविरोधात हुंड्यासाठी मानसिक आणि शारिरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. हुंड्यासाठी वैष्णवीने आयुष्य संपवले, असा दावाही केला जात आहे.
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी मुलीच्या लग्नात ५१ तोळे सोने आणि फॉर्च्युनर कार भेट दिली होती. या शाही लग्न सोहळ्याला अजित पवार देखील हजर राहिले होते. लग्न मंडपात लावलेली कार पाहून अजित पवार यांनी अनिल कस्पटे यांना ‘तुम्ही स्वतःहून कार दिली की हगवणे कुटुंबीयांनी कार मागितली?’ असा खोचक सवाल सर्वांसमक्ष केला होता.