वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी, दि. 21 रोजी होणार असून, तब्बल 19 दिवस मतमोजणी लांबल्याने निवडणूक निकालाबाबत मोठी उत्सुकता आहे. मतमोजणी प्रक्रिया 4 फेऱ्यांमध्ये होणार असून, अवघ्या एक तासात संपूर्ण निकाल तर एक मशीन असलेल्या प्रभागात अवघ्या 10 मिनिटांत निकाल लागण्याची शक्यता आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा तेलभाते व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. 21 रोजी सकाळी दहा वाजता नगरपंचायत सभागृहामध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. इत्यादी सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडून मतपेट्या बाहेर काढण्यात येणार असून, सर्व प्रक्रियेची व्हिडिओ शूटिंग होणार आहे.
मतमोजणी प्रक्रियेसाठी सात टेबल लावण्यात आलेले आहेत. एकूण चार फेऱ्या होणार आहेत. ज्या प्रभागात दोन मतपेट्या होत्या, त्या प्रभागाची मोजणी एकाच टेबलवर होणार आहे. त्यामुळे अशा प्रभागांची मोजणी दोन फेऱ्यांमध्ये होईल. इतर सर्व प्रभागांची मोजणी एकाच फेरीत संपणार आहे. एका फेरीला साधारणतः 15 मिनिटांचा कालावधी लागणार असल्याने एक ते दीड तासात मतमोजणी पूर्ण होणार आहे.
मतमोजणी प्रक्रियेसाठी उमेदवार किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी व एक मतमोजणी प्रतिनिधी याप्रमाणे एका उमेदवाराच्या फक्त दोन प्रतिनिधींनाच उपस्थित राहता येणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना सात प्रतिनिधी देता येणार आहेत. संबंधित प्रतिनिधींना मतमोजणीच्या ठिकाणी येण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार ठेवण्यात आलेले आहे. ज्या प्रभागाची मोजणी पूर्ण होईल त्या प्रभागातील प्रतिनिधींना सभागृहाच्या बाहेर जावे लागणार आहे.
एकूण 17 प्रभागांच्या मतदानासाठी 24 मतदान केंद्रे होती. त्यानुसार, प्रभागनिहाय मतमोजणी टेबल लावण्यात आले आहेत. एकूण 4 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत प्रभाग 1,2,3,4,5,6,7 मधील मोजणी होणार आहे. दुसऱ्या फेरीत प्रभाग 1/2, 2/2, 8, 9, 10, 11 व 7/2, तिसऱ्या फेरीत, प्रभाग 12, 13, 14, 15, 16 व 17 तसेच चौथ्या 13/2, 15/2, 16/2 व 17/2 याप्रमाणे मतमोजणी पूर्ण होणार आहे. यामध्ये प्रत्येकी दोन मतपेट्या असलेल्या प्रभाग 1,2,7 चा निकाल दुसऱ्या फेरीत तर 13,15,16,17 या प्रभागाचा निकाल चौथ्या फेरीत लागणार आहे.
रविवारी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी सर्व कर्मचारी हे महसूल विभागातील असून, त्या सर्व कर्मचाऱ्यांना शुक्रवार, दि. 19 रोजी मतमोजणी प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच मतमोजणीच्या दिवशी सकाळी आठ वाजता सर्वांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच उमेदवार व उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्यासाठी शुक्रवार, दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.