गणेश विनोदे
वडगाव मावळ: एकेकाळी नामवंत कुस्तीगीरांमुळे मावळ तालुक्याचे नाव कुस्तीक्षेत्रात जिल्ह्यात नव्हे, तर राज्यभरात ओळखले जात होते; परंतु आधुनिक जिमच्या काळात तालमी बंद पडल्या आणि कुस्तीगीरांची संख्या घटली आहे. यामुळे मावळचे नाव उज्वल करणारी कुस्तीची परंपरा लोप पावत चालली असून, या परंपरेला पुन्हा वाव देण्यासाठी सुसज्ज असे कुस्ती संकुल उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
जुन्या काळात गावचे ग््राामदैवत किंवा मारुती मंदिराला लागून तालीम असायची, ही तालीम म्हणजेच व्यायाम करण्याचे एकमेव ठिकाण असायचे. केवळ जोर, बैठका मारून, पोषक असा आहार घेऊन तब्येत करायची आणि तालमीच्या लाल मातीच्या हौदात कसरत करून कुस्ती शिकायची याचा छंदच त्याकाळच्या तरुण पिढीला होता.
गावातील तालमी पडू लागल्या ओस
कालांतराने तालमीची जागा जिमने घेतली आणि जिममध्ये व्यायाम करण्यासाठी नवनवीन साहित्य असल्याने तालमी ओस पडू लागल्या. कुस्तीची जागा वेटलिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग क्रीडाप्रकारांनी घेतली. यामध्ये प्रामुख्याने शहरी भागातील तरुणांचा सहभाग असला तरी ग््राामीण भागातील तरुणांचा ओढा ही जिमकडे वळू लागला, त्यामुळे ग््राामीण भागातील कुस्तीची परंपरा ही काहीशी कमी होऊ लागली आहे. विविध संस्था, सार्वजनिक मंडळ किंवा गावामार्फत चालवली जाणारी जिम अथवा तालीम हा प्रकार कमी झाला आहे. आता आधुनिक मशिनरी असलेल्या मोठमोठ्या खासगी जिम आता सुरू झाले आहेत. सहाजिकच आधुनिक मशिनरी असल्याने अशा खासगी जिमकडे तरुणांचा कल वाढत असून, कुस्तीबरोबरच वेटलिफ्टिंग पावर लिफ्टिंग खेळाची आवडही कमी होऊ लागली असल्याचे दिसते.
तरुणांना व्यायामाबरोबर मिळत होते संस्कार
ही तालीम केवळ कुस्ती शिकण्यासाठी किंवा तब्येत करण्यासाठी नव्हती, तर याच तालमीत वस्ताद किंवा गावातील ज्येष्ठ मंडळींकडून तरुणांना सामाजिक संस्कारही मिळत होते. तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे, उत्तम ज्ञानाबरोबरच उत्तम शरीरयष्टी बनवली पाहिजे, कुटुंबाचे किंवा आई वडिलांचे नाव मोठे होईल यादृष्टीने कसरत केली पाहिजे याची शिकवण तरुणांना मिळत होती. त्यामुळे ही शिक्षण देणारी शाळा नसली तरी संस्कार घडविणारी शाळा होती.
शालेय शिक्षणाबरोबर कुस्तीचे धडे देणे गरजेचे
मावळ तालुक्याची जुनी ओळख असलेली कुस्ती परंपरा जोपायची असेल तर तालुक्यातला तरुण वर्ग पुन्हा कुस्ती क्षेत्राकडे वळणे आवश्यक आहे. यासाठी तालीम या व्यायाम शाळेला अनुसरून भव्य असे कुस्ती संकुल उभारणे गरजेचे आहे. तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी कुस्ती संकुल उभारले, तर ग््राामीण आणि शहरी भागातील तरुण या कुस्ती संकुलात राहून कुस्तीबरोबरच शालेय शिक्षणही घेऊ शकतो.
क्रीडासंकुलच्या धर्तीवर कुस्ती संकुल उभारावे
मावळ तालुक्याची कुस्ती परंपरा टिकवायची असेल तर एकतर गावोगावी असलेल्या जुन्या तालमींना पुनर्जीवित करण्याची आवश्यकता आहे किंवा तालुक्याच्या ठिकाणी अथवा मध्यवर्ती ठिकाणी शासकीय निधीतून क्रीडा संकुलच्या धर्तीवर कुस्ती संकुल उभारण्याची मागणी केली जात आहे.