वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील धामणे येथे नऊ वर्षांपूर्वी शेतावर वास्तव्यास असलेल्या फाले कुटुंबावर दरोड्याच्या उद्देशाने हल्ला करून तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या अतिसंवेदनशील तिहेरी खून प्रकरणात वडगाव मावळ येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सन 2017 मध्ये घडलेल्या या घटनेत अहिल्यानगर जिल्ह्यातील फासे पारधी टोळीतील 11 आरोपींनी दरोड्याच्या वेळी फाले कुटुंबातील तिघांची हत्या केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक मुगुट भानुदास पाटील यांनी अत्यंत बारकाईने तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले होते.
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपी नागेश उर्फ नाग्या भोसले, छोट्या उर्फ बापू काळे, बाब्या उर्फ भेन्या चव्हाण, सेवन उर्फ डेंग्या प्याव लाभ, दिलीप पांडू चव्हाण, सुपार उर्फ सुपर्या चव्हाण, राजू तुकाराम शिंगाड, अजय शिवाजी पवार, योगेश बिरजू भोसले आणि दीपक बिरजू भोसले (जमिनावर) यांना दोषी ठरवून एकत्रितरित्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
एक आरोपी प्रकरणातून वगळण्यात आला असून, या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. स्मिता चौगले यांनी प्रभावी युक्तिवाद केला. एसीपी म्हाळुंगे विभागाचे सचिन तुकाराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली.
दरम्यान या निकालामुळे फाले कुटुंबाला न्याय मिळाला असून, गंभीर गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षा होऊ शकते. हा समाजाला दिलेला संदेश असल्याची भावना व्यक्त होत.