वडगाव मावळ: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत युतीचे किंवा बिनविरोधचे दिलेले प्रस्ताव फेटाळून स्वतःचे खिसे भरण्यासाठी निवडणुका लढवायला लावत आणि अखेरच्या क्षणी ईव्हीएम मशीन हॅक करण्याच्या नावाखाली उमेदवारांकडून प्रत्येकी 25 ते 35 लाख रुपये भाजप नेत्यांनी उकळले असल्याचा गौप्यस्फोट आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. तसेच, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वडगाव मावळ येथे आयोजित कृतज्ञता मेळाव्यात आमदार सुनील शेळके बोलत होते. या वेळी माजी मंत्री मदन बाफना, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश ढोरे, रामनाथ वारिंगे, महादू कालेकर, काळूराम मालपोटे, दीपक हुलावळे, सुरेश चौधरी, छबुराव कडू, माऊली ठाकर, गणेश काकडे, कृष्णा कारके, अशोक भेगडे, सुरेश धोत्रे, माऊली ठाकर, अंकुश आंबेकर, सुनील भोंगाडे, सारिका शेळके, महिलाध्यक्ष सुवर्णा राऊत, ग्रामीणचे अध्यक्ष संदीप आंद्रे, किशोर सातकर तसेच सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
भाजप नेत्यांचे सूडबुद्धीचे राजकारण
आमदार शेळके यांनी पुढे बोलताना गेल्या सहा वर्षांत केवळ गलिच्छ, खुनशी आणि सूडबुद्धीचे राजकारण भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केले असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच, या निवडणुकीच्या माध्यमातून मावळच्या जनतेने त्यांना मतातून प्रत्युत्तर दिले असल्याचे सांगितले. या निवडणुकीत त्यांना उमेदवार मिळत नव्हते, अनेकांना पक्षाचा आदेश आहे, तुमच्या शिवाय पर्याय नाही, असे सांगून उमेदवारी घ्यायला भाग पाडले. उमेदवारांना नाहक खर्च करायला लावला आणि स्वतःचे खिसे भरले, असाही सणसणीत आरोप शेळके यांनी या वेळी केला.
मदन बाफना यांनी अजितदादांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपला तालुका म्हणजे सुनील शेळके आहे, त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले. रामनाथ वारिंगे म्हणाले, की आतापर्यंत आमदार शेळके एकटे बास होते, पण यापुढे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची साथ त्यांना आवश्यक आहे. त्यादृष्टीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. दीपक हुलावळे यांनीही आम्ही पडत्या काळात राष्ट्रवादीचा गड सांभाळला असून, यापुढेही तो ताब्यात ठेवू, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी महादू कालेकर, चंद्रभान खळदे, सुवर्णा राऊत, संध्या थोरात, सुनील भोंगाडे, किशोर सातकर आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुशांत बालगुडे यांनी केले. प्रास्ताविक राज खांडभोर यांनी केले तर दीपाली हुलावळे यांनी आभार मानले.
...तर 2029 ला सुनील शेळकेंच्या विरोधात जा
आमदार शेळके यांनी या वेळी बोलताना जवळचे सहकारी आणि नातेवाईक यांच्यावरही हल्लाबोल करत यांच्यापैकी कोणाला वाटत असेल की, हा सुनील शेळके आमच्यामुळे आमदार आहे. तर, त्यांनी 2029 ला सुनील शेळकेच्याविरोधात जा असे खुले आव्हान जवळच्या सहकाऱ्यांना व नातेवाईकांनाही दिले. तसेच, 2029 ला राष्ट्रवादीचा आमदार दीड लाखाच्या मताधिक्याने विजयी केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
आमच्या भावनांशी खेळू नका : गणेश खांडगे
बंद जलवाहिनी प्रकल्पावरून बदनामी केली. नगर परिषद इमारतीचे भूमिपूजन केले, तर गोमूत्र शिंपडून जागा पवित्र केली. तेच भाजपचे नेते निवडणुकीत अजित प्रतिष्ठान स्थापन करून गोरगरिबांची सेवा करू, अशी वल्गना करतात आणि लगेचच मी नाही बोललो आमचा कार्यकर्ता बोलला, असे बोलून वेळ मारून नेतात. त्यांचं काळीज तरी कुठल्या दगडाचं आहे ? असा सवाल करून आमच्या नेत्याला नेहमी पाण्यात पाहणाऱ्यांनी आमच्या भावनांशी खेळू नये, असा इशारा तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी भाजपच्या नेत्यांना दिला.
ज्यांनी काम केले त्यांनाच स्वीकृतची संधी
दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत ज्यांनी प्रामाणिक काम केले ज्यांच्या गावात, भागात मताधिक्य मिळाले त्यांनाच किंवा त्या गावातील, भागातील कार्यकर्त्यालाच जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य होण्याची संधी दिले जाणार, असे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले.