पिंपरी: ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास सुख, शांती, संपत्ती लाभेल, असे सांगून धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या अमेरिकी नागरिकासह तिघांविरोधात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून, विधी संघर्षित अल्पवयीन मुलाला आईच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याप्रकरणी सनी बन्सीलाल दनानी (२७, रा. ब्लॉक सी-१७, वैष्णवी मंदिराजवळ, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, आरोपी शेफर जेविन जेकब (४१, रा. माय होम बिल्डिंग ए-२०४, मुकाई चौकाजवळ, मूळ रा. कॅलिफोर्निया, अमेरिका), स्टीवन विजय कदम (४६, रा. फ्लॅट क्रमांक ५०१, रायसोनी सोसायटी, उद्यम नगर, अजमेरा, पिंपरी) आणि एका विधी संघर्षित बालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. २७) पिंपरी येथे घडला. (Latest Pimpri News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास मानसिक समाधान, सुख, शांती व आर्थिक सहाय्य मिळेल, प्रभू येशूच खरा देव आहे, इतर धर्म आणि देव केवळ काल्पनिक आहेत, असे म्हणत धर्मांतराचा आग्रह केला. यामुळे फिर्यादीच्या धार्मिक भावना दुखावल्या असून त्यांच्या श्रद्धेचा अपमान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी शेफर जेकब आणि स्टीवन कदम यांना अटक केली असून, अल्पवयीन बालकास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींची अंगझडती घेत मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २९९, ३(५) व विदेशी नागरिक कायदा कलम १४ (b)(c) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.