Murder Pudhari
पिंपरी चिंचवड

Urse Maval Murder Case: उर्से मावळमध्ये चुलत भावाकडून तरुणाचा खून; आरोपी फरार

झारखंडमधील दोघा भावांतील वाद टोकाला; विठ्ठल मंदिराजवळ मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

उर्से मावळ: मावळ तालुक्यातील उर्से येथे एका परप्रांतीय तरुणाची त्याच्याच चुलत भावाने खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दोन्ही तरुण मूळचे झारखंड राज्यातील असून, हत्येनंतर आरोपी फरार झाला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. उर्से, सोमाटणे परिसरात अलीकडे अशा प्रकारच्या घटनांची मालिका सुरूच आहे.

लोकेश जगदीश निषाद असे खून झालेल्याचे नाव आहे. तर, आरोपी डिकेश ओलकर निषाद हा फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघा भावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वाद सुरू होता. या वादाचे पर्यवसान आज टोकाच्या संघर्षात झाले आणि रागाच्या भरात चुलत भावानेच तरुणाचा जीव घेतला. दोघेही तरुण 11 फेबुवारी रोजी पुण्यातून उर्से येथे एका इमारतीत भाड्याने राहण्यासाठी आले होते. ते एकाच इमारतीत वेगवेगळ्या मजल्यांवर राहत होते.

12 फेबुवारी रोजी कामावरून परतल्यानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर उर्से गावातील विठ्ठल मंदिराजवळ तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेनंतर आरोपी फरार आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, तपास सुरू आहे. ठोस माहिती हाती आल्यानंतर गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी

दरम्यान, गेल्याच आठवड्यात सोमाटणे टोलनाक्याजवळील मैदानावर खेळाच्या वादातून एका परप्रांतीय तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर उर्सेतील या ताज्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गस्त वाढवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

तसेच, उर्से येथील वाढते औद्योगिक क्षेत्र व त्यामुळे वाढणारी परप्रांतीय लोक संख्या यामुळे वाढणारी गुन्हेगारी यावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटी एका चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेतील आरोपी परप्रांतीय होता. या घटनेला दीड महिना झाला आहे त्यातच ही आणखी एक घटना समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT