पिंपरी : जुन्या भांडणाच्या वादातून तीन जणांनी मिळून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करत खून केला. ही धक्कादायक घटना रविवारी (दि. 11) रात्री साडेदहाच्या सुमारास वडमुखवाडी येथील साई मंदिराजवळ घडली. या प्रकरणात दिघी पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिघा आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे वडमुखवाडी परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोहम सचिन शिंदे (17, रा. माऊली नगर कॉलनी क्र. 1, दिघी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सोहमचे वडील सचिन प्रल्हाद शिंदे (46) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीवरून नामदेव ऊर्फ निलेश शिंदे, शुभम पोखरकर आणि सुमित शिंदे या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
पोलिस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सोहम शिंदे आपल्या काही मित्रांसोबत वडमुखवाडी येथील साई मंदिराजवळ गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपी तेथे आले.
त्यांनी सोहम याच्याशी जुन्या भांडणावरून वाद घातला. त्याला शिवीगाळ करत, तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत अचानक कोयत्याने त्याच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी सोहमच्या डोक्यावर, छातीवर आणि पाठीवर कोयत्याने सपासप वार केले.
या हल्ल्यात सोहम गंभीर जखमी झाला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
ही घटना घडल्यानंतर दिघी पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि मालमत्ता विरोधी गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच आरोपी नामदेव ऊर्फ निलेश शिंदे, शुभम पोखरकर आणि सुमित शिंदे यांना ताब्यात घेतले. तपास दिघी पोलिस करत आहेत.