दोनशे कोटींचा ग्रीन बॉण्ड; राज्यातील पहिली पालिका Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri News: दोनशे कोटींचा ग्रीन बॉण्ड; राज्यातील पहिली पालिका

ग्रीन बॉण्ड म्हणजे काय ?

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात हरित सेतू प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने खुल्या बाजारपेठेतून ग्रीन बॉण्डद्वारे (हरित कर्जरोखे) 200 कोटी रुपयांचा निधी यशस्वीपणे उभारला आहे.

त्या माध्यमातून महापालिका पर्यावरणपूरक स्वतंत्र पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि पीएमपीएल, मेट्रो या सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे. परिणामी, या निधीतून हरित सेतू प्रकल्पास गती मिळणार आहे. हा प्रकल्प राज्यातील इतर मोठ्या शहरासाठी पथदर्शक ठरणार आहे. (Latest Pimpri News)

महापालिकेने पवना, मुळा आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी म्युन्सिपल बॉण्डद्वारे 200 कोटी रुपयांचा निधी 28 जुलै 2023 ला उभारला आहे. तो निधी मुळा नदी सुधार प्रकल्पाच्या वाकड बायपास ते सांगवी पूल या 8.80 किलोमीटर अंतराच्या नदीपात्राच्या महापालिकेकडून बाजूच्या कामासाठी वापरण्यात येत आहे. ते काम 9 ऑक्टोबर 2024 ला सुरू झाले आहे. त्यासाठी 274 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. कामाची मुदत तीन वर्षे आहे.

हरित सेतू प्रकल्पासाठी महापालिकेने ग्रीन बॉण्डद्वारे 200 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. पहिल्या टप्प्यात प्राधिकरण, निगडी येथील वॉर्ड क्रमांक 15 येथे हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्यासाठी 132 कोटी 43 लाख रूपयांचा खर्चास स्थायी समितीने 19 सप्टेंबर 2024 ला मान्यता दिली आहे. त्याचे कामही सुरू झाले आहे.

त्यात 5 चौरस किलोमीटर क्षेत्रफळातील 5 प्रमुख रस्त्यांच्या समावेश आहे. एकूण 4.02 किलोमीटर अंतराचे हरित मार्ग तयार केले जाणार आहेत. त्या प्रकल्पात निरोगी, स्वच्छ प्रदूषण मुक्त सुरक्षित वातावरण तयार करण्यात येणार आहे.

याअंतर्गत स्वतंत्र पदपथ आणि सायकल ट्रॅक तयार करून ते कार्यालय, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक केंद्र, व्यापारी संकुल, मनोरंजन स्थळ, बीआरटीएस थांबे व मेट्रो स्टेशनला जोडण्यात येणार आहेत. पदपथ व सायकल ट्रॅक हे झाडे तसेच, कृत्रिम छताच्या सावलीत असणार आहेत.

ग्रीन बॉण्डमुळे हरित सेतू प्रकल्पास चालना मिळणार आहे. प्राधिकरण-निगडीनंतर हा प्रकल्प उर्वरित सात क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील प्रत्येकी एका वॉर्डात राबविण्यात येणार आहे. त्याद्वारे बालकांपासून ज्येष्ठांना चालण्यास तसेच, सायकल चालविण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

खासगी वाहनांचा कमीत कमी वापर व्हावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहे. तसेच, ग्रीन बॉण्डचा निधी भोसरी एमआयडीसीतील गवळीमाथा ते इंद्रायणी नगर चौक या टेल्को रस्त्यावर अर्बन स्ट्रीट डिजाईनने विकसित करण्यासाठीही वापरला जाणार आहे.

ग्बारा वॉर्डात हरित सेतू प्रकल्प

महापालिकेकडून प्रायोगिक तत्त्वावर प्राधिकरण-निगडी या वॉर्ड क्रमांक 15 येथे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी 132 कोटी 43 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर हा प्रकल्प शहरातील सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयातील एका वॉर्डात राबविण्यात येणार आहे.

ब क्षेत्रीय कार्यायातील चिंचवड वॉर्ड क्रमांक 8(2.15 किमी), क क्षेत्रीय कार्यालयातील भोसरी, प्राधिकरण व गावठाण वॉर्ड क्रमांक 8 6.66 किमी), ड क्षेत्रीय कार्यालयातील वाकड व पिंपळे निलख वॉर्ड क्रमांक 26(5.51 किमी), ई क्षेत्रीय कार्यालयाच्या भोसरी व दिघी वॉर्ड क्रमांक 4 व 5 (4.68 किमी), फ क्षेत्रीय कार्यालयाच्या संभाजीनगर वॉर्ड क्रमांक 11 व 12 (5.01 किमी), ग क्षेत्रीय कार्यालयातील थेरगाव व रहाटणी वॉर्ड क्रमांक 23 व 24 (3.85 किमी) आणि ह क्षेत्रीय कार्यालयाच्या सांगवी वॉर्ड क्रमांक 31 व 32 (3.19 किमी) येथे हरित सेतू प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे.

शेअर मार्केटमध्ये बेल रिंगींग

पिंपरी-चिंचवड महापालिकेने ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून 200 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. यानिमित्त ग्रीन बॉण्डच्या लिस्टिंग निमित्ताने बेल रिंगिंग समारंभ मुंबई शेअर बाजार येथे मंगळवारी (दि.10) झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.

या वेळी आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, मुख्य लेखा अधिकारी प्रवीण जैन, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनिल पवार उपस्थित होते.

गुंतवणूकदारांनी दाखविलेला विश्वास पिंपरी-चिंचवडच्या भविष्याची पावती

महापालिकेने केलेली ही कामगिरी केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर पर्यावरणपूरक व हवामानानुकूल नागरी विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास पिंपरी चिंचवडच्या शाश्वत भविष्याची पावती आहे. हा निधी केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर, हरित विकास घडवण्यासाठी वापरण्याचा महापालिकेचा मानस आहे, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

ग्रीन बॉण्ड काढणारी पिंपरी-चिंचवड राज्यातील पहिली महापालिका

पिंपरी-चिंचवड महापालिका ही ग्रीन बॉण्डद्वारे निधी उभारणारी महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरली आहे. या इश्यूला केवळ एका मिनिटात 100 कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला. एकूण 513 कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्या. निधीवर 7.85 टक्के व्याजदर आहे. मालमत्ताकरातून मिळणार्‍या उत्पन्नाचे एस्क्रो खाते तयार करण्यात आले आहे.

ग्रीन बॉण्ड म्हणजे काय ?

ग्रीन बॉण्ड हे एक कर्ज साधन (बॉण्ड) आहे. हा शेअर मार्केटमधून निधी उभारण्याचा प्रकार आहे. हा निधी विशेषतः पर्यावरण आणि हवामान बदलांशी संबंधित प्रकल्पांसाठी वापरला जातो. ग्रीन बॉण्ड जारी करून महापालिका गुंतवणूकदारांकडून पैसे उधार घेते. त्या निधीचा वापर पर्यावरणास अनुकूल आणि हवामान बदलांना मदत करणार्‍या पर्यावरणपूरक प्रकल्पांवर केला जातो.

विकासासाठी टाकलेले पाऊल अभिमानास्पद : मुख्यमंत्री फडणवीस

शहरात पर्यावरणपूरक व शाश्वत शहरी विकास प्रकल्प राबविण्यासाठी ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून निधी उभारणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे. ही केवळ पिंपरी चिंचवड शहरासाठीच नव्हे, तर राज्य सरकारसाठीदेखील अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ते म्हाणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्थानिक स्वराज्य संस्थांनी म्युनिसिपल बॉण्डद्वारे जास्तीत जास्त निधी उभारावा, यासाठी सातत्याने आग्रही असतात. यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने आघाडी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT