

वर्षा कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील नाट्यगृहांच्या कार्यक्रमांची ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया सुरू होणार, असे म्हणता म्हणता ती मागील दोन ते अडीच महिन्यांपासून लांबणीवर पडली आहे. ऑनलाईन बुकिंगचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे; मात्र अद्याप ऑनलाईन बुकिंगसाठी मुहूर्त लागत नसल्याचे चित्र आहे. फक्त पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरमध्येच ऑनलाईन बुकिंग सुरू झाले आहे.
महापालिकेच्या वतीने शहरातील नाट्यगृहात कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ऑनलाईन बुकींग करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. त्यामुळे आयोजकांना घरबसल्या हवी ती तारीख बुक करता येईल, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. (Latest Pimpri News)
सांस्कृतिक कार्यक्रमांचे सध्या तिमाही बुकींग केले जाते. तीन महिन्यांचे कार्यक्रम आदल्या महिन्यात प्रत्यक्ष निवेदने घेऊन बुक केले जातात. सांस्कृतिक कार्यक्रमाचे बुकिंग करताना अनेकदा चुका होतात. तर काहीवेळा एकाच दिवशी दोन कार्यक्रम बुकिंग होण्याचे प्रकार झाले आहेत. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ऑनलाईन झाल्यास त्याचा फायदा कलाकारांसह महापालिकेलादेखील होणार आहे.
जुलै 2023 पूर्वी शहरातील सर्व नाट्यगृहांचे कामकाज क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुरू होते. त्यानंतर ते महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे वर्ग झाले. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाला मागणी तुलनेने अधिक असते.
तर पिंपरीचे आचार्य अत्रे रंगममदिर, नवी सांगवीचे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह यांनादेखील काही नियोजित कार्यक्रम होतात. भोसरीच्या कै. अंकुशराव लांडगे सभागृहात नाटकांचे प्रयोग सोडून इतर कार्यक्रत होतात. तर नव्याने झालेल्या प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृहात गायन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रत सध्या होत आहेत.
कार्यक्रम रद्दनंतर 20 टक्के रिफंड कपात
ऑनलाईन भाडे देताना वाढीव दराने एका नाटकासाठी तांत्रिक खर्च पकडून काही ठराविक भाडे आकारले जाईल. ही रक्कम आधीच भरायची असून, व्यावसायिक नाट्यसंस्थांना एकावेळी कमीतकमी 6 ते 10 प्रयोगाची रक्कम एकाचवेळी द्यावी लागते. ही रक्कम आता लाखांत जाईल. पण त्यातील एखादा कार्यक्रम रद्द झाला तर 20 टक्के रक्कम कपात करून दिली जाणार आहे.
ठराविक संस्थांकडून आगाऊ बुकिंग
शहरातील चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात प्रयोग करण्यासाठी नेहमीच कलाकार आणि नाट्य संस्था उत्सुक असतात. त्यात प्रायोगिक असो किंवा व्यावसायिक संस्था सर्वांना मध्यवर्ती ठिकाण असल्याने मागणी अधिक असते; मात्र सध्या शनिवार, रविवार व्यावसायिक संस्थाच बुकिंग करून ठेवत असल्याने शहरातील प्रायोगिक संस्थांना शनिवार व रविवार बुकिंग मिळत नाही. शनिवार, रविवारच्या तारखा व्यावसायिक संस्थांनीच आगाऊ बुकिंग केल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे स्थानिकांना प्राधान्य मिळत नाही.
आमच्याकडून ऑनलाईन बुकिंगची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर याठिकाणी सुरू आहे. इतर ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. फक्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह याठिकाणी कार्यक्रम जास्त असल्यामुळे समस्या येत आहे. बहुतांश जणांना ऑनलाईन बुकिंग अजून करता येत नाही.
- पंकज पाटील (सहाय्यक आयुक्त, क्रीडा विभाग)