Mumbai Pune Expressway Traffic Update
लोणावळा: स्वतंत्र दिनाला जोडूनच शनिवार व रविवारची सुट्टी आल्याने या लॉंग वीकेंड चा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्या खाजगी वाहनांमधून पर्यटन स्थळी जाण्यास निघाल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून पर्यटकांना तासनतास या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावे लागत आहे. लोणावळा शहरात देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
लोणावळा शहरातील भुशी धरण, लायन्स पॉईंट, खंडाळा राजमाची गार्डन, ड्युक्स नोज पॉइंट, सनसेट पॉईंट, खंडाळा तलाव या सर्व परिसरामध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने ही सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. (Latest Pimpri News)
लोणावळा शहरामध्ये मागील तीन चार दिवसापासून हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे तसेच काल रात्रीपासून सर्वत्र धूक्याचे काहूर माजले आहे. अशा या वातावरणामध्ये फिरण्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळ्यात थांबत आहेत. आपल्या नजरेमध्ये व आपल्या मोबाईल मध्ये हा सर्व अविष्कार टिपण्यासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सलग तीन दिवस सुट्टी आल्याने या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बोरघाट महामार्ग पोलीस व खंडाळा महामार्ग पोलीस यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे वाहनांच्या लांब पर्यंत रांगा गेल्या आहेत. त्यातच घाट परिसरामध्ये काही वाहने ही बंद देखील पडत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.