पिंपरी: गौरी गणपती म्हटलं की खरेदी आलीचं. याच खरेदीसाठी बाजारपेठ सजली आहे. गणरायाच्या पाठोपाठ आगमन होते ते गौराईंचे. या गौराईंच्या सजावट साहित्या खरेदीसाठी महिलावर्गाची तयारी सुरु असते. यंदा गौरींसाठी रेडिमेड साडी आणि दागिन्यांची रेलचेल असल्याने खरेदीला वेग आला आहे. त्याच्या तयारीत आता सगळा महिलावर्ग दंग आहे.
दागिने खरेदी हा तर गौरीच्या खरेदीचा महत्त्वाचा भाग आहे. दागिन्यांमध्ये लक्ष्मीहार, चपलाहार, मोहनमाळ, ठुशी, बोरमाळ, राणीहार, मंगळसूत्र, मोत्यांचे दागिने, नथ, कंबरपट्टा, बांगड्या या दागिन्यांनी गौरींना सजवले जाते. पारंपरिक म्हणून मोत्यांचे दागिने देखील आवर्जुन वापरतात. तसेच मोहनमाळ, पुतळ्या, बोरमाळ, कोल्हापुरी साज तसेच जय मल्हारच्या हारालादेखील चांगलीच मागणी आहे. या सगळ्या दागिन्यांनी सध्या बाजारपेठ सजली आहे. (Latest Pimpri News)
बाजारात गौरींच्या कापडी, शाडूच्या, पी.ओ.पीच्या अशा तीन प्रकारच्या मुर्ती उपलब्ध आहेत. अनेक सुबक, विविध आकाराच्या, आखीव-रेखीव मुखवटे आणि सजलेल्या गौरी बाजारात प्रत्येकाचे लक्ष वेधत आहेत.
मुखवट्यांची किंमत सुमारे 500 ते 1000 रुपयांपर्यंत आहे. मूर्तीच्या बॉडीची किंमतही 500 रुपयांपासून सुरु होते. स्टँडही आकारानुसार उपलब्ध आहे. त्यांचीही किंमत 500 ते 1000 रुपये अशी आहे. अखंड मुर्ती स्ट़ँडसह 4000 ते 7000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत; तसेच यंदा फायबर बॉडीच्या गौरीही उपलब्ध झाल्या आहेत. त्या 8 ते 12 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
गौरांसाठीच्या माळा आणि दागिने 150 रुपये ते 2000 रुपये अशा किमतींत बाजारात उपलब्ध आहे. दागिन्यांमध्ये मोत्यांचे आणि खड्यांचे दागिने असे प्रकार पाहायला मिळतायतं. मुकुटांमध्ये अधिक सुबक आणि नाजूक डिझाईनच्या मुकुटांना अधिक मागणी पाहायला मिळतेयं. मोत्याच्या दागिन्यांच्या किंमतींमध्येही विविधता आहे.
त्यामुळे जास्तीत जास्त वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण दागिन्यांचा वापर करुन गौरीला सजवण्याची जणू स्पर्धाचं महिलांमध्ये लागलेली असते. साड़ीला साजेसे दागिने, फुलांचे हार, फुलांच्या वेण्या यांचा वापर करुन गौरीला भक्तीभावाने सजवले जाते. चंद्रकोर डोरल, यांना विशेष मागणी आहे. पांढर्या मोत्यांच्या दागिन्यांना देखील महिलांची पसंती मिळत आहे.
गौराईंसाठी स्पेशल नऊवार साड्यांना मागणी
गौरींना साडी नेसवणे ही खरी कला आहे. पण सर्वांनाचं हे जमते असे नाही.. हीच समस्या लक्षात घेऊन आता रेडीमेड साड्या बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. आपल्याला हवी ती साडी आवडीप्रमाणे शिवून मिळतेच; परंतु त्याचबरोबर आता खास पारंपरिक पध्दतीच्या रेडिमेड साड्या मिळत असल्याने महिलावर्गाला दिलासा मिळाला आहे. यात नऊवार आणि सहावार अशा दोन्ही प्रकारच्या साड्या रेडिमेड उपलब्ध आहे. यामुळे गौराईंच्या सौंदर्यात आणखीन भर पडणार हे नक्की.