पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात नियम धाब्यावर बसवून नैसर्गिक नाले व ओढे बुजवून बांधकाम तसेच, गृहप्रकल्प उभे केले जात आहेत. पावसाळ्यात पाण्यास वाट न मिळाल्याने ते पाणी थेट आजूबाजूच्या लोकवस्तीत शिरत असल्याचे प्रकार वाढले आहेत. त्याचा फटका रहिवाशांसह सदनिकाधारकांना बसत आहे.
नियम धाब्यावर बसवून नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदल्याचा प्रकार थेरगाव येथील सर्व्हे क्रमांक 27 येथे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाल्याच्या दोन्ही बाजूंना 6 मीटरचा बफर झोन सोडणे बंधनकारक असताना, या नियमाचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले आहे. महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने यापूर्वीच पत्राद्वारे धोक्याचा इशारा दिला असतानाही, महापालिकेच्या बांधकाम व स्थापत्य विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत बांधकाम परवानगी दिल्याचा गंभीर आरोप वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य अजिंक्य बारणे यांनी केला आहे.
थेरगावमधील सर्व्हे क्रमांक 27 मधून एक मोठा नैसर्गिक नाला वाहतो. कोणत्याही नैसर्गिक जलस्रोताचा प्रवाह बदलणे किंवा त्यावर बांधकाम करणे कायद्याने गुन्हा आहे. महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने या जागेची पाहणी करून लेखी पत्र दिले होते.
नाल्याचा मूळ मार्ग बदलला, तर भविष्यात या परिसरात तीव्र पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. नाल्याचा प्रवाह बदलल्यामुळे किंवा तो अरुंद केल्यामुळे नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता प्रचंड प्रमाणात कमी होईल.
पावसाळ्यात आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरून मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे नियमानुसार नाल्याच्या दोन्ही बाजूंना सहा मीटरचा बफर झोन ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, मात्र ड्रेनेज विभागाच्या या तांत्रिक अभ्यासाला व इशार्याला बांधकाम व स्थापत्य विभागाकडून केराची टोपली दाखवण्यात आली.
विहिरीवर बांधकाम
त्या जागेत एक जुनी विहीर अस्तित्वात आहे. नैसर्गिक पाण्याचा स्रोत जिवंत असतानाही, ती विहीर थेट गृहप्रकल्पाच्या पार्किंगच्या भागात समाविष्ट केली आहे. विहिरीच्या जागेवरच पार्किंगचे स्लॅब टाकून त्यावर गृहप्रकल्प उभा केला जात आहे. नैसर्गिक अशा प्रकारे बांधकाम करणे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत धोकादायक मानले जाते. भविष्यात जमिनीची धूप होऊन किंवा पाण्याच्या दबावामुळे पार्किंगचा भाग खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सदनिकाधारकांचा जीव धोक्यात
या जागेची तत्काळ वरिष्ठ अधिकार्यांमार्फत पुनर्तपासणी आणि मोजणी करण्यात यावी, ड्रेनेज विभागाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणार्या बांधकाम परवानगी देणार्या स्थापत्य विभागाच्या संबंधित अधिकार्यांची व विकासकाची चौकशी व्हावी. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून हे नियमबाह्य बांधकाम तात्काळ थांबवून दिलेली मंजुरी रद्द करण्यात यावी.
या बेकायदा बांधकामामुळे भविष्यात या गृहप्रकल्पामध्ये राहण्यास येणार्या निष्पाप नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात नाला भरल्यास संपूर्ण सोसायटी परिसर पाण्याखाली जाण्याची भीती आहे. विहिरीवरील इमारतीचा पाया कमकुवत होऊन मोठी दुर्घटना घडू शकते, असे वृक्ष प्राधिकरण समितीचे माजी सदस्य अजिंक्य बारणे यांनी सांगितले.
सहा मीटर अंतराची बफर झोन ठेवल्यानंतर बांधकामास परवानगी
थेरगाव सर्व्हे क्रमांक 27 मधील जागेतील नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य कार्यकारी अभियंत्याकडून अहवाल दिला आहे. त्यानुसार, महापालिका आयुक्तांनी नाल्याचा प्रवाह बदलण्यास मंजुरी दिली.
तसेच, त्या जागेतील विहीरदेखील तशीच ठेवून तिचे पुनरुज्जीवन करण्यात आलेले आहे. नाल्याच्या बाजूलादेखील 6 मीटर अंतर ठेवल्यानंतर बांधकाम परवानगी मंजूर केली आहे, असे महापालिकेचे सहशहर अभियंता सुनील भागवानी यांनी सांगितले.