पीडब्ल्यूडी मैदानावरील अतिक्रमणाचा विळखा सुटणार; जलसंपदा विभागाकडून कामाला गती  Pimpri News
पिंपरी चिंचवड

Pimpri News: पीडब्ल्यूडी मैदानावरील अतिक्रमणाचा विळखा सुटणार; जलसंपदा विभागाकडून कामाला गती

मैदान परिसर होणार सुरक्षित

पुढारी वृत्तसेवा

दापोडी: नवी सांगवी येथील जलसंपदा विभागाचे मैदान हे पीडब्ल्यूडी मैदान म्हणून ओळखले जाते. हे मैदान जलसंपदा विभाग प्रशिक्षण केंद्र, जलसंपदा यांत्रिकी भवन, दापोडी व महापालिका यांच्या मालकीचे आहे.

सद्य:स्थितीत या मैदानावर अनेक टवाळखोर, ‘तळीरामां’ची बैठक, राडारोडा, झोपड्या, भाजीविक्रेते व हॉटेल व्यावसायिक, दुचाकी प्रशिक्षण असे अतिक्रमण झाले आहे. आता या मैदानाभोवती सीमाभिंत उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणांचा विळखा सुटण्यास मदत होणार आहे. (Latest Pimpri News)

जलसंपदा विभागाच्या वतीने कामगार वसाहत व जलसंपदा अधिकारी प्रशिक्षण केंद्र या दोन इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. तर सांगवी पोलिस ठाण्यासाठी काही जागा देण्यात आलेली आहे. महापालिकेच्या जागेवर बॅडमिंटन हॉल, संत सावता माळी उद्यान व पाण्याच्या दोन टाक्या, गुरांचा जुना दवाखाना, समाज मंदिर आहे. तसेच उद्यान, शाळा, कचरा, सांडपाणी प्रकल्प, दशक्रिया घाटासाठी जागा आरक्षित आहे.

विविध उपक्रमांसाठी महत्त्वाचे ठिकाण

‘पीडब्ल्यूडी मैदान’ ही केवळ एक मोकळी जागा नसून, परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे केंद्र आहे. महापालिकेच्या वतीने दरवर्षी महिला बचत गटांसाठी ‘पवना थडी’ जत्रा याच मैदानावर भरते.

विविध क्रीडा स्पर्धा भरविण्यासाठी पंचक्रोशीतील खेळाडू त्याचा उपयोग करतात. जलसंपदा विभागाला मैदानातून काही प्रमाणात उत्पन्न मिळते. जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी, पिंपळे निलखसह परिसरातील खेळाडू आणि नागरिक नियमितपणे क्रिकेट, व्हॉलिबॉल, फुटबॉल यांसारख्या खेळाच्या सरावासाठी मोफत वापर करतात.

मात्र, काही खेळाच्या संघटना मैदानावर सिमेंट काँक्रीट करत स्वतःचा हक्क सांगत असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर येत आहे. त्यामुळे या जलसंपदा विभागाच्या पीडब्ल्यूडी मैदानास बांधली जाणारी भिंत ही मैदानासाठी व तेथून घडणार्‍या नवोदित खेळाडूंसाठी नव संजीवनी ठरेल.

अनुचित प्रकार घडण्याचीही शक्यता

जलसंपदा यांत्रिकी भवनाच्या अंतर्गत असलेल्या कामगार वसाहतीतील इमारतींमध्ये दोन इमारती वगळता सर्व इमारती बंद असून, त्या ठिकाणी अतिक्रमण करत राजरोसपणे काही नागरिक राहताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याचीही शक्यता आहे.

मैदानास सीमाभिंत बांधत असताना अतिक्रमण करणार्‍या व्यावसायिकांचा, झोपडीधारकांचा त्रास होत आहे. सीमाभिंत बांधून पूर्ण झाल्यानंतर या मैदानाचा योग्य कामासाठी अधिक वापर होईल.
- नंदकुमार वंजारे, उप अभियंता, जलसंपदा प्रशिक्षण केंद्र.
सीमाभिंतीचे बांधकाम जलसंपदा विभाग व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संयुक्तपणे होत आहे. सद्यस्थितीत या जागेत यांत्रिकी भवनाच्या दोन कामगार वसाहती सुरू असून भिंत बांधल्यानंतर मैदान व इतर विभागांनाही अधिक सुरक्षा लाभणार आहे.
- पद्माकर अडारी, कनिष्ठ अभियंता, जलसंपदा यांत्रिकी भवन, दापोडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT