पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय Pudhari
पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय : दर्जा वाढला; मात्र कारभार जुन्याच नावावर

Pimpari Chinchwad RTO : राज्य सरकारची परवानगी व इतर तांत्रिक अडचणींमुळे उपप्रादेशिक नावानेच कारभार सुरु

पुढारी वृत्तसेवा

पंकज खोले

या आहेत समस्या

  • ताण वाढला, अधिकारी संख्या पूर्वीएवढीच

  • वाहन चाचणीसाठी आयडीटीआरला विरोध

  • इमारतीची दुरवस्था, कार्यालय अपुरे

  • वाहन पार्किंग, अर्जदारांचे हेलपाटे

  • ऑनलाईनमुळे तांत्रिक अडचणी

  • चाचणीवेळी तीन वेळा तपासणीचा मनस्ताप

  • रकमेचा भरणा जुन्याच खात्यावर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक कार्यालयाचा कारभार वर्षभरापूर्वी प्रादेशिक नावाने सुरु झाला. त्यानुसार कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते अधिकार्‍यांच्या नावाची पाटी देखील बदलण्यात आली; मात्र अद्यापही नागरिकरांना डीडी भरताना, रकमेचा भरणा करताना उपप्रादेशिक परिवहन नावाने व्यवहार करावा लागत आहे; तसेच तक्रार करण्यासाठी जुन्याच ई- मेल आयडीचा वापर केला जात आहे. राज्य सरकारची परवानगी व इतर तांत्रिक अडचणींमुळे उपप्रादेशिक नावानेच कारभार सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

शासनाच्या जुलै 2023 निर्णयानुसार कार्यालयाचा दर्जा वाढवून तो पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन करण्यात आले; मात्र प्रत्यक्ष कारभार सुरु होण्यास वेळ लागला. दुसरीकडे, कार्यालयाचा दर्जा वाढवूनही अनेक मंजुर पदांपैकी काही पदे रिक्त आहेत. परिणामी, ताण वाढून इतर अधिकार्‍यांवर कार्यभार सोपविण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत जुन्नर, आंबेगाव, पिंपरी, चिंचवड, मावळ, खेड याचा समावेश होतो. दर्जा वाढल्याने अधिकार्‍यांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा होती. पंरतु, परिवहन अधिकारी व्यतिरिक्त अन्य अधिकारीवर्ग संख्येत वाढ झाली नाही; मात्र या कार्यालयातील सहायक परिवहन अधिकारी यांना बढती मिळाली आहे. त्यांची जागा गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त आहेत.

दरम्यान, पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच प्रत्यक्षात कारभाार हा जुन्या नावाने म्हणजेच उप प्रादेशिक परिवाहन डीआरटीओ 14 या नावानेच चालतो. त्यामुळे चलन भरणे, डीडीचा भरणा करणे या गोष्टी त्या नावानचे केल्या जात आहेत; तसेच विशेष म्हणजे नागरिकांच्या तक्रारी व त्यावर उत्तर देखील याच मेल आयडीच्या माध्यमातून पाठवली जातात. त्यामुळे कार्यालयाचे नाव बदलले मात्र, कारभार जुन्याच नावाने सुरू आहे.

नवीन ट्रॅक, तपासणी केंद्र वाढविणे गरजेचे

परिवहन कार्यालयाचा दर्जा वाढल्यानंतर नव्याने काही यंत्रणा होणे गरजेचे आहे. ऑनलाईन प्रणाली सुरु झाली आहे; मात्र प्रत्यक्षात आणखी बदल होणे गरजेचे आहे. त्यामध्ये नवीन ट्रॅक, अद्ययावत तपासणी केंद्र, अधिकारी यांना बसण्यासाठी कक्ष, पार्किंग व्यवस्था, सारथी सिस्टीम यात नव्याने काही बदल करावे लागणार आहेत; तसेच प्रलंबित वाहन परवाने आणि फिटनेस संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

चार अधिकारी पदे रिक्त

नव्याने पद निर्माण झाल्याने 4 वरिष्ठ अधिकारी तसेच, 20 कर्मचार्‍यांची येथील कार्यालयास आवश्यकता आहे. त्यात एक उप प्रादेशिक, दोन सहायक परिवहन अधिकारी यांची देखील खुर्ची रिकामी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT