पहिल्याच पावसात शहर खड्डेमय; केवळ 508 खड्डे असल्याचा महापालिकेचा दावा  File Photo
पिंपरी चिंचवड

PCMC: पहिल्याच पावसात शहर खड्डेमय; केवळ 508 खड्डे असल्याचा महापालिकेचा दावा

पहिल्याच पावसात पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पहिल्याच पावसात पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचून चिखल व खड्डी निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे विविध भागात तब्बल 508 खड्डे पडले. पावसाळ्यापूर्वी 855 असे एकूण 1 हजार 356 खड्डे शहरात आढळले. त्यापैकी 848 खड्डे बुजविले असून, 508 खड्डे बुजविण्याचे काम सुरू असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

या संदर्भात पुढारीने छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. तसेच, खड्डे बुजविण्यासाठी नवीन अ‍ॅपची निर्मिती केली आहे. (Latest Pimpri News)

पावसाळ्यातील चार महिने वगळता शहरातील विविध भागात पाणीपुरवठा, ड्रेनेज, विद्युत, गॅस वाहिनी, नेटवर्किंग, सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्ट सिटी, महामेट्रो, अर्बन स्ट्रीट डिजाईन अशा विविध प्रकल्पांसाठी रस्ते खोदाई केली जाते. रस्ते खोदाईसाठी 15 मे अखेरपर्यंत महापालिकेची मुदत होती.

मुदतीनंतर रस्ते खोदाई केल्यास दंड आणि गुन्हे दाखल करण्याचा महापालिकेने इशारा दिला होता. मात्र, अत्यावश्यक बाब म्हणून पावसाळ्यातही रस्ते खोदाई सुरूच आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. त्यावरून रस्त्यांचा तसेच, रस्ते दुरुस्तीचा दर्जा किती सुमार आहे, हे स्पष्ट होत आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दीत 855 खड्डे आढळले. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे सात ते आठ दिवस अधून-मधून जोरदार पाऊस पडत होता. या पावसामुळे शहरभरात मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर तब्बल 501 खड्डे पडल्याचे महापालिकेच्या पाहणीत समोर आले आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना खड्यातून वाट काढावी लागत आहे. खड्ड्यांच्या बाजूला खडीमुळे वाहने घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत. पावसाळ्यापूर्वी आणि मागील आठवड्यात असे एकूण पडलेल्या 1 हजार 356 खड्ड्यांपैकी 848 खड्डे बुजविल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

त्यामध्ये डांबर आणि कोल्ड मिक्सने 444, बीबीएमने म्हणजे खडीने 36, पेव्हिंग ब्लॉकने 288, सिंमेंट काँक्रीटने 42 असे 848 खड्डे पूर्णपणे बुजविले आहेत. शहरात फक्त 508 खड्डे बुजवायचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. पाऊस कमी झाल्याने खड्डे बुजविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

संबंधित ठेकेदारांकडून खड्डे भरून घेणार

पीसीएमसी पॉटहोल मॅनेजमेंट या अ‍ॅपमध्ये खड्ड्यांची नोंद होत आहे. एखाद्या रस्त्यावर पुन्हा खड्डा पडल्यास अ‍ॅपमध्ये दिसेल. त्यामुळे एका ठिकाणी दोनदा खड्डा पडल्यास संबंधित अधिकारी, ठेकेदारावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. रस्त्याच्या किरकोळ कामाला एक वर्षे, डांबरी रस्त्याला तीन आणि सिमेंटच्या रस्त्याला पाच वर्षे दोष दायित्व निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यावर खड्डे पडल्यास ते संबंधित ठेकेदरांकडून दुरुस्त करून घेण्यात येणार आहेत, असे महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT