इंदुरी: मावळ तालुक्यातील भंडारा डोंगर पायथ्याशी असलेल्या चाळीस एकर शेतजमिनीत महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने कृषी अधिकारी मधुकर जगताप यांनी सोयाबीन व भात लागवडीचे नियोजन केले आहे. त्यानुसार वीस एकरांवर सोयाबीनचे व इतर वीस एकरांवर भातीचे पिक घेतले जाणार असून शेतकरी आता ट्रॅक्टरच्या साह्याने शेतजमीन तयार करत आहेत. (Latest Pimpri News)
गेल्या मंगळवारी आदित्य खेडेकर यांनी सुदवडी येथे सोयाबीन फुले संगम या वाणाची पेरणी केली. त्यासोबतच शिफारस केलेल्या एनपीके १५:१५:१५ खताचा वापर करण्यात आला. कृषी अधिकारी जगताप यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार पेरणीनंतर १५ दिवसांत सोयाबीनचे रोप वर येईल, दीड महिन्यात शेंगा लागतील व तीन महिन्यांनंतर काढणीला सुरुवात होईल.
योग्य पाऊस झाल्यास चांगल्या उत्पादनाची शक्यता असून शेतकरी ट्रॅक्टरवरील अवलंबित्व वाढवित आहेत. चाकण येथे एक जोडी बैलाची किंमत दीड ते दोन लाखांपर्यंत असते. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना ती परवडत नसल्याने त्यांनी ट्रॅक्टरकडे वळणे पसंत केले आहे.