पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी होणार्या 25 चौकांतील कोंडी सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पहिल्या टप्प्यात दहा चौकांमध्ये वाय जंक्शन संकल्पना, वाहनांसाठी मार्गिका, बोलार्ड बसविणे, संकेतचिन्हे, रस्त्यावर पांढरे पट्टे मारणे, दुभाजक, एकेरी वाहतूक, रस्ता रुंदीकरण करण्यात आले. त्यामुळे या चौकांतील वाहतूक शिस्तबद्ध झाली असून, चौक कोडींमुक्त झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात लोकसंख्येसोबतच खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. बेशिस्त वाहनचालक, रस्त्यालगतच्या अतिक्रमणांमुळे सकाळी व सायंकाळी वर्दळीच्या वेळेत अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडी होते. या कोंडीमुळे वाहन चालकांना मनस्ताप होतो. दरम्यान, ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाने 80 चौकांची पाहणी केली. त्यात 25 चौक कोंडीचे आढळले.
राज्य शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडीच्या 25 चौकांपैकी पहिल्या टप्प्यात दहा चौकांतील कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. त्यामध्ये चौकांची नव्याने रचना करण्यात आली. अतिक्रमण हटविले. वाय-जंक्शनद्वारे सुस्पष्ट रस्ता विभाजन, रस्ते दुरुस्ती, दुभाजक, पांढर्या रंगाचे पट्टे मारून वाहनासांठी मार्गिका, काही चौकांमध्ये वाहतूक नियंत्रण सिग्नल, एकेरी मार्ग, चौकांमधील सर्कल हटविणे, रस्ते रुंद करणे, पादचारी, सायकलस्वारांसाठी स्वतंत्र मार्गिका बनविणे आदी कामे करण्यात आली. चौकात वाहतुकीच्या दृष्टीने बोलार्ड बसविण्यात आले. दिशादर्शक, खबरदारीचे फलक उभारण्यात आले. त्यामुळे चौकातून वाहनांना निश्चित मार्गाने जावे लागत आहे. परिणामी, वाहतूक शिस्तबद्ध झाली. चौकात कोंडी होत नाही. चौकातील वाहतूक पूर्वीपेक्षा सुकर, विनाअडथळा होत आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
दहा चौक कोंडीमुक्त करण्यासाठी सुरुवातीला तात्पुरत्या उपाययोजना केल्या. त्यानुसार वाहतूक कोंडी सुटते का, याचा अभ्यास केला. त्यानुसार डिझाईन करून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे चौकातील वाहतूक सुरळीत झाली. वाहनचालकांना वाहतुकीत सुसूत्रता, सुरक्षिततेचा अनुभव मिळत आहे.
यामुळे प्रवासाचा वेळ व इंधनाची बचत होत आहे. अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. उर्वरित 15 चौकही लवकरच कोंडीमुक्त करण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.
किवळे येथील मुकाई चौक, रावेत अशुद्ध जलउपसा केंद्र, पुनावळे जंक्शन, ताथवडे चौक, भोसरी येथील वखार महामंडळ चौक, शिवार चौक, स्वराज्य, घरकुल, त्रिवेणीनगर आणि आकुर्डीतील खंडोबा माळ परिसरातील वाय जंक्शन हे दहा चौक कोंडीमुक्त झाले आहेत. तेथे वाहतूक कोंडी न होता वाहतूक सुरळीत होत आहे, असा दावा महापालिकेच्या अधिकार्यांनी केला आहे.