दापोडी: राज्यात शैक्षणिक वर्ष नुकतेच सुरू झाले असताना शिक्षकांवर विविध शासकीय कामांचा वाढता भार पडू लागला आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना नियमित आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन देण्यापेक्षा शिक्षकांना प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम शाळांमधील अध्यापनावर होत असून, अनेक ठिकाणी वर्ग रिकामे राहत आहेत. तसेच पर्यायी व्यवस्था करताना मुख्याध्यापकांचीही मोठी कसरत होत आहे.
निवडणूक प्रक्रिया, मतदार यादी विशेष पुनरावलोकन (एसआयआर), विविध सर्वेक्षणे, माहिती संकलन, ऑनलाइन नोंदी, जनजागृती मोहिमा तसेच इतर शासकीय कामांची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात येत आहे. ही कामे महत्त्वाची असली, तरी त्यासाठी शिक्षकांना वारंवार शाळेबाहेर जावे लागत असल्याने नियमित तासिकांमध्ये व्यत्यय येत आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वअभ्यासासाठी बसविण्यात येत आहे, तर काही महापालिका तसेच खासगी शाळांमध्ये एकाच शिक्षकाकडे दोन ते तीन वर्गांची जबाबदारी सोपविली जात आहे.
शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचा काळ विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच कालावधीत नियमित अध्यापन विस्कळीत झाल्यास अभ्यासक्रम पूर्ण करणे, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि वैयक्तिक मार्गदर्शन करणे कठीण होत असल्याची कबुली शिक्षक खासगीत बोलून दाखवत आहेत. विशेषतः इयत्ता दहावी व बारावीसारख्या महत्त्वाच्या वर्गांतील विद्यार्थ्यांच्या तयारीवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, शिक्षक, शासकीय कामांवर गेल्यानंतर शाळेतील संपूर्ण नियोजनाची जबाबदारी मुख्याध्यापकांवर येते. दररोज पर्यायी वेळापत्रक तयार करणे, उपलब्ध शिक्षकांमध्ये वर्गांचे नियोजन करणे आणि शाळेचे दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवणे, यासाठी त्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे शैक्षणिक नियोजनावरही ताण निर्माण होत आहे.शिक्षणाशी थेट संबंध नसलेली शासकीय कामे स्वतंत्र यंत्रणेमार्फत करून घेण्याची मागणी केली जात असून शिक्षकांना त्यांच्या मूळ अध्यापनाच्या कार्यासाठी पुरेसा वेळ मिळाल्यास विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल आणि शिक्षणाचा दर्जाही उंचावेल, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
वर्ग रिकामे, टाईमटेबलचा बट्ट्याबोळ
शाळेतील शिक्षक विविध शासकीय कामांसाठी बाहेर गेल्यानंतर संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर येते. कोणत्या वर्गावर कोणाला पाठवायचे, पर्यायी शिक्षकांची व्यवस्था कशी करायची, वेळापत्रकात तातडीने बदल कसे करायचे, यासाठी त्यांना रोज धावपळ करावी लागत आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वअभ्यासासाठी बसविण्याची वेळ येत आहे. परिणामी, नियमित अध्यापनाचा वेग मंदावत असून अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान मुख्याध्यापकांसमोर उभे राहिले आहे.