Talegaon triple massacre
तळेगाव तिहेरी हत्याकांड. Pudhari File Photo
पिंपरी चिंचवड

तळेगाव तिहेरी हत्याकांड : माय लेकरांचा युद्धपातळीवर शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : नराधम प्रियकराने प्रेयसीच्या मृतदेहासह तिच्या दोन चिमुरड्या मुलांना नदीमध्ये फेकून दिले. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. २२) तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. दरम्यान, एनडीआरएफ आणि वन्यजीव रक्षकांच्या एकूण पाच टीम नदीमध्ये उतरल्या असून मायलेकरांचा शोध युध्दपातळीवर सुरू आहे.

समरीन निसार नेवरेकर (वय २५), ईशांत (वय ५ वर्ष), आणि इजान (वय २ वर्ष) अशी शोध सुरू असलेल्या माय लेकरांची नावे आहेत. याप्रकरणी आरोपी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (३७, रा. समता कॉलनी, वराळे, मावळ), रविकांत भानुदास गायकवाड (४१, रा. डॉन बॉस्को कॉलनी, ईश्वरानंद सोसायटी, सावेडी, अहमदनगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींना केली अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजेंद्र दगडखैर याने ६ जुलै समरीन नेवरेकर हिला गर्भपात करण्यासाठी मित्र रविकांत गायकवाड याच्यासोबत कळंबोली येथे पाठविले. दरम्यान, रुग्णालयात गर्भपात सुरू असताना समरीन हिचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी आपसात संगनमत करून ९ जुलै रोजी समरीनचा मृतदेह आणि तिच्या दोन्ही लहान मुलांना तळेगाव येथील वराळे येथे आणले. इंद्रायणी नदीत फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन त्यांचा ठरला. त्यानुसार, इंद्रायणी नदीत आरोपींनी समरीनचा मृतदेह फेकला. आईला फेकल्याचे पाहून दोन्ही मुले मोठमोठ्याने रडू लागली. त्यामुळे नराधम आरोपींनी दोन्ही मुलांना देखील जिवंतपणे नदीत फेकून दिले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

एनडीआरएफ, वन्यजीव रक्षकांच्या टीमकडून शोध मोहीम सुरू

या घटनेचे तीव्र पडसाद समाजाच्या सर्व स्तरावर उमटले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत समरीन नेवरेकर हिच्या नातेवाईकांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी केली आहे. दरम्यान, समरीन हिच्या मृतदेहासह दोन चिमूरड्या मुलांना शोधण्यासाठी एनडीआरएफ आणि वन्यजीव रक्षकांच्या पाच टीम नदीमध्ये उतरल्या आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत टीमकडून शोधकार्य सुरू होते.

एनडीआरएफ आणि वन्यजीव रक्षकांच्या टीमकडून दिवसभर शोध मोहीम घेण्यात आली. पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे नदी किनारी असलेल्या गावातील सर्व ग्रामस्थांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. बुधवारी (दि. २४) सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे.
प्रदीप रायन्नवार, वरिष्ठ निरीक्षक, तळेगाव दाभाडे
SCROLL FOR NEXT