पिंपरी : प्रेयसीच्या मृतदेहासह चिमुरड्यांनाही फेकले नदीत

नराधम प्रियकरासह दोघे अटकेत
Death of married girlfriend during abortion operation
प्रेयसीच्या मृतदेहासोबत दोन चिमुरड्या मुलांना इंद्रायणी नदीत फेकून दिले.Pudhari File Photo
Published on
Updated on

पिंपरी : गर्भपाताचे ऑपरेशन करताना विवाहित प्रेयसीचा मृत्यू झाला. दरम्यान, नराधम प्रियकर मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना प्रेयसीच्या दोन मुलांनी रडून गोंधळ घातला. त्यावेळी त्याने प्रेयसीच्या मृतदेहासोबत दोन चिमुरड्या मुलांना इंद्रायणी नदीत फेकून दिले. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (22 जुलै) सकाळी उघडकीस आला.

समरीन निसार नेवरेकर (वय 25) आणि ईशांत (5), इजान (2), अशी मृत्यू झालेल्या माय-लेकरांची नावे आहेत. तसेच, गजेंद्र दगडखैर (रा. वराळे, मावळ) असे नराधमाचे नाव आहे. त्याच्यासह रविकांत गायकवाड (रा. डॉन बॉस्को कॉलनी, ईश्वरानंद सोसायटी, सावेडी, अहमदनगर), गर्भपात करणारी एजंट महिला बुधवंत आणि अमर हॉस्पिटल, कळंबोली येथील डॉक्टरविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दगडखैर आणि गायकवाड यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 30 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गर्भपाताचे ऑपरेशन सुरू असताना समरीनचा मृत्यू

पिंपरी पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. तळेगाव येथील घटना असल्याने पिंपरी पोलिसांनी ही तक्रार तळेगाव पोलिसांकडे वर्ग केली. तळेगाव पोलिस तक्रारीची चौकशी करत असताना सनसनाटी माहिती समोर आली. बेपत्ता असलेल्या समरीन नेवरेकर हिला 6 जुलै रोजी तिचा प्रियकर दगडखैर याने गर्भपात करण्यासाठी मित्र रविकांत गायकवाड याच्यासोबत कळंबोली येथे पाठविले होते. रुग्णालयात गर्भपाताचे ऑपरेशन सुरू असताना समरीनचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी आपसात संगनमत करून 9 जुलै रोजी तिचा मृतदेह आणि तिच्या दोन्ही लहान मुलांना वराळे येथे आणले.

घरच्यांना सांगितले परीक्षेचे कारण

समरीनचे मूळ गाव अक्कलकोट (जि. सोलापूर) आहे. गर्भपात करण्यासाठी 5 जुलै रोजी ती दोन्ही मुलांसमवेत घराबाहेर पडली. आपण बारावी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी अक्कलकोटला जात असल्याचे खोटे कारण तिने घरच्यांना सांगितले. यानंतर आरोपी रविकांतसोबत ती कळंबोली येथे गेली. दिवसभरात तिने कुटुंबीयांशी संपर्क साधला नाही. घरच्यांनी कॉल केला तरीही तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने 6 जुलै रोजी पिंपरी पोलिस ठाण्यात दिली.

आईला नदीत फेकताच दोन्ही मुलांनी टाहो फोडला

इंद्रायणी नदीत फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा आरोपींचा प्लॅन ठरला. त्यानुसार, इंद्रायणी नदीत आरोपींनी समरीनचा मृतदेह फेकला; मात्र आपल्या आईला फेकल्याचे पाहून दोन्ही मुले मोठमोठ्याने रडू लागली. आपले बिंग फुटेल म्हणून नराधम आरोपींनी दोन्ही मुलांनाही नदीत फेकून दिले. रात्री उशिरापर्यंत इंद्रायणी नदीमध्ये तिघांचेही मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.

डॉक्टरही अडचणीत

गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना कळंबोली येथील डॉक्टरनेदेखील हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे. समरीनचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरने स्थानिक पोलिसांना माहिती देणे अपेक्षित होते; मात्र, त्यांनी तसे न करता मृतदेह आरोपींच्या ताब्यात दिला. त्यामुळे कळंबोली येथील अमर हॉस्पिटलमधील डॉक्टरही अडचणीत आले आहेत.

तांत्रिक तपासामुळे फुटले बिंग

समरीन बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर तळेगाव पोलिसांनी तांत्रिकद़ृष्ट्या तपास सुरू केला. कॉल रेकॉर्डवरून आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला; मग आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news