Talegaon Weekly Market Issues Pudhari
पिंपरी चिंचवड

Talegaon Weekly Market Issues: तळेगाव आठवडे बाजारातील गैरव्यवस्थापन; स्थलांतराला व्यापाऱ्यांचा विरोध

शौचालय, पार्किंग व वीज सुविधांचा अभाव; अतिक्रमणामुळे बाजारात अनागोंदी

पुढारी वृत्तसेवा

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगर परिषदेला आठवडे बाजारातून चांगले उत्पन्न मिळत असतानाही बाजाराचे योग्य नियोजन होत नसल्याचे दिसत आहे. सार्वजनिक शौचालय नसल्याने विशेषतः महिलांची कुंचबना होत आहे. बाजाराच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहे. तसेच, बाजारात पुरेशी विद्युत व्यवस्था नाही. बाजार संपल्यानंतर त्याच दिवशी रात्री या ठिकाणची स्वच्छता होत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

बाजार इतरत्र स्थलांतर न करण्याची मागणी

तळेगाव दाभाडे शहरातील आठवडे बाजाराला शंभर वर्षांपेक्षा जुनी परंपरा आहे. या बाजारावर शहरातील लहान-मोठे व्यापारी, शेतकरी, फळ विक्रेते यांचा उदरनिर्वाह चालतो. हा बाजार गाव भागातून हटवून इतरत्र नेऊ नये, याकरिता तळेगाव दाभाडे शहरातील व्यापाऱ्यांनी नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील तसेच मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांना निवेदन दिले आहे.

स्थानिकांना मिळतोय रोजगार

तळेगाव दाभाडे परिसरातील सुमारे शंभर व्यापारी व विक्रेते यांनी नगरपालिकेत येऊन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. श्री सरसेनापती खंडेराव दाभाडे सरकार यांनी सुरू केलेल्या या बाजाराला ऐतिहासिक महत्त्व आहे. मावळ तालुक्यातील नागरिक बाजाराच्या निमित्ताने तळेगावात येवून व्यवसाय करतात. वर्षांनुवर्षे इथल्या बाजारपेठेत भरणारा आठवडे बाजार अन्य ठिकाणी हलवू नये. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला चांगली चालना मिळते. तसेच, यामाध्यमातून स्थानिकांनाही चांगला रोजगार मिळत आहे. बाजार अन्य ठिकाणी हलवून येथील स्थानिक व्यापाऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.

परप्रांतीयांचे अतिक्रमण

गेल्या काही वर्षांपासून बाजारात परप्रांतीय नागरिकांमुळे अतिक्रमण वाढले आहे. नगरपालिकेचे नाममात्र भाडे भरून हे परप्रांतीय व्यवसाय करत असल्याने स्थानिक शेतकरी व व्यापाऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे नगरपालिकेमार्फत मावळ तालुक्यातील स्थानिकांना आयकार्ड बनवून द्यावे, जेणेकरून परप्रांतीयांचे अतिक्रमण होणार नाही. मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक व सुभाष चौक या ठिकाणी हे परप्रांतीय व्यावसाय करत असल्याने बाजारपेठेत बसणारे शेतकरी व व्यापारी यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. तसेच, वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. हे तीनही चौक बाजारादिवशी मोकळे करावेत, अशी विनंतीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बाजाराला शिस्त लावण्याची मागणी

पूर्वीपासून या आठवडे बाजाराला शिस्त होती. फळ विक्रेते, भाजी विक्रेते, मासे विक्रेते व इतर सामान विकणारे व्यावसायिक यांच्या बसायच्या जागा निश्चित केलेल्या होत्या. त्यामुळे विशिष्ट ठिकाणीच या वस्तूंचा व्यवसाय होत होता, परंतु परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणामुळे बाजाराला शिस्त राहिली नाही. कोणीही कुठेही बसून व्यापार करत आहेत. त्यामुळे जे स्थानिक व्यापारी व शेतकरी व्यापार करतात त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. तरी बाजाराला पुन्हा शिस्त लागावी याकरिता काही प्रमुख व्यापाऱ्यांची कमिटी स्थापन करून येत्या काळात नगरपालिका प्रशासन, नगराध्यक्ष, नगरसेवक व पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT