तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकातील स्व. केशवराव वाडेकर व्यापारी संकुलात तळेगाव दाभाडे नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून उभारलेले नगर परिषदेचे सार्वजनिक स्वच्छतागृह आज अक्षरशः दुर्लक्षित अवस्थेत आहे. गेल्या तब्बल दोन वर्षांपासून हे स्वच्छतागृह बंद असल्याने व्यापारी संकुलातील दुकानदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मूलभूत सुविधाही देण्यात अपयशी ठरत असलेल्या नगर परिषद प्रशासनाविरोधात व्यापाऱ्यांमधून तीव संताप व्यक्त होत आहे.
या व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांना नैसर्गिक विधींसाठी थेट घरी जावे लागत असून, विशेषतः महिलांची मोठी कुचंबना होत आहे. शहरात आधीच सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता असताना, उपलब्ध सुविधा बंद ठेवणे ही नगर परिषदेची बेफिकीर वृत्ती दर्शवते, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांतून उमटत आहे.
देखभालीअभावी या स्वच्छतागृहाची अवस्था बिकट झाली आहे. नियमित स्वच्छता न झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे याच व्यापारी संकुलात तळेगाव दाभाडे नगर परिषदेची सर सेनापती उमाबाई दाभाडे मुलींची शाळा आहे. शाळेच्या परिसरातच अशी अस्वच्छता असणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
सध्या या बंद स्वच्छतागृहाचा वापर अज्ञात व्यक्तींकडून कांदे, बटाटे तसेच भाजीपाल्याचे कॅरेट साठवण्यासाठी केला जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. सार्वजनिक सुविधेचे असे गोदामात रूपांतर होणे ही प्रशासनाच्या निष्क्रियतेची ठळक उदाहरणे आहे. व्यापारी संकुलातील सर्व गाळेधारकांनी एकमुखाने मागणी केली आहे की, नगर परिषदेने तातडीने या स्वच्छतागृहाची दुरुस्ती करून नियमित स्वच्छता व्यवस्था सुरू करावी व हे स्वच्छतागृह नागरिकांना वापरण्यायोग्य करून द्यावे.
महिलांची होतेय कुचंबना
जिजामाता चौकातील स्व. केशवराव वाडेकर व्यापारी संकुलात तळेगाव नगर परिषदेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून स्वच्छतागृह उभारले आहे. परंतु, मूलभूत सोयीसुविधा, स्वच्छता यामुळे येथील स्वच्छतागृह कुलूप बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे व्यापारी संकुलात ज्या महिलांचे व्यवसाय आहेत त्यांना तसेच ग््रााहकांना या स्वच्छतागृहाचा उपयोग करता येत नाही. यामुळे महिला वर्गाची मोठी कुचंबना होत आहे. संबंधित विभागाने येथील स्वच्छतागृह त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे.
स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेबाबत आम्ही वेळोवेळी नगर परिषदेला लेखी व तोंडी कळविले आहे. मात्र, प्रशासनाने आजवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. नगर परिषद आमच्याकडून सर्व प्रकारचे कर नियमितपणे वसूल करते. गाळे घेताना प्रत्येकी 10 ते 12 लाख रुपयांचे डिपॉझिटही भरले आहे. कर भरणारे नागरिक म्हणून निदान स्वच्छ आणि कार्यरत स्वच्छतागृहाची सुविधा मिळणे आमचा हक्क आहे.जगदीश भेगडे, गाळेधारक