तळेगाव दाभाडे: नुकत्याच पार पडलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांचा पदग््राहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, गणेश खांडगे, गणेश भेगडे, रवींद्र भेगडे, अंजलीराजे दाभाडे, वृषालीराजे दाभाडे, सत्येंद्रराजे दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नगर परिषद भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमाला नवनिर्वाचित 28 नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात खासदार श्रीरंग बारणे यांनी नवनिर्वाचित प्रतिनिधींना शुभेच्छा देत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे उपयोग करून शहराचा नियोजित विकास साधावा, असे आवाहन केले. तळेगाव दाभाडे हे औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून, येत्या काळात पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.
या वेळी आमदार सुनील शेळके म्हणाले. की सत्ता ही केवळ पद भोगण्यासाठी नसून, ती सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी असते. हाच विचार घेऊन आम्ही सर्वजण काम करत आहोत. संतोष दाभाडे यांच्या नेतृत्वात नगर परिषदेचा कारभार पारदर्शक आणि गतिमान होईल, याची मला खात्री आहे.
नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन विकासाभिमुख कामकाज केले जाईल. राजकारणापेक्षा शहराच्या विकासाला प्राधान्य देत तळेगाव शहराला आधुनिक, स्वच्छ व नागरिकाभिमुख शहर बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील.संतोष दाभाडे, नगराध्यक्ष