तळेगावात इच्छुक लागले कामाला; आरक्षणावर सोडतीनंतर होणार राजकीय उलथापालथ  Pudhari
पिंपरी चिंचवड

Talegaon Dabhade Local Elections: तळेगावात इच्छुक लागले कामाला; आरक्षणावर सोडतीनंतर होणार राजकीय उलथापालथ

आगामी तीन-चार महिने या निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे राजकीय उलथापालथ घडविणारी असेल.

पुढारी वृत्तसेवा

अमिन खान

तळेगाव दाभाडे: मावळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मित्रपक्षांमधील घटक पक्षांचे स्थानिक नेते आपापला राजकीय वर्चस्ववाद सिद्ध करण्यासाठी अधिक आक्रमक झाले आहेत. आगामी तीन-चार महिने या निवडणुकांच्या रणधुमाळीमुळे राजकीय उलथापालथ घडविणारी असेल.

त्यात तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीवर परस्पर विरोधी नेत्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. साडेसात वर्षांनंतर ही निवडणूक होत असून, उमेदवारीच्या शर्यतीत प्रथमच निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या मोठी असण्याची शक्यत आहे. (Latest Pimpari chinchwad News)

स्व:घोषित भावी नगरसेवकांनी सध्या मिळेल त्या संस्थांच्या कार्यक्रम-उपक्रमात घुसखोरी करायचा सपाटा लावला आहे. जागोजागी स्वतःचे फोटो असलेले बॅनर्स लटकविले आहेत. सोशल मीडियावरही त्यांच्या प्रसिद्धीच्या पोस्टवर पोस्ट्सचा रतीब सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच शहरातील राजकीय वातावरण गरम झाले आहे.

मूळ समस्यांवरील चर्चा गायब

नेत्यांच्या राजकीय वाकयुध्दात पक्षीय आणि वैयक्तिक वाद-प्रतिवादाचेच मुद्दे असल्याने तालुक्यातील मूळ समस्यांवरील चर्चा गायब झाली आहे. बेरोजगारी, गुन्हेगारी, सरकारी भ्रष्टाचार, शहरी भागातील रस्ते, पाणी, वीज आदी नागरी समस्या, महागाई, ग्रामीण भागातील लोकांच्या अपेक्षा यावर निवडणुकीच्या या इर्षेत कोणी बोलत नसल्याची खंत काही नागरिकांनी व्यक्त केली. तळेगाव दाभाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत 28 वॉर्ड असतील. तसेच, नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र जागा राहील.

सध्या प्रसिद्धीच्या झळकणाऱ्या पोस्टर्स, बॅनर्स, मोबाईल पोस्ट्स आणि सार्वजनिक कार्यक्रमातील खुल्या प्रवर्गीयांचा सहभाग पाहता सर्वांधिक स्पर्धा खुल्या प्रवर्गातील इच्छुकांमध्येच होणार असल्याचे समोर आले आहे. यात युवा नवउमेदवार इच्छुक अधिक आहेत. महिलांनीदेखील यंदा उत्स्फूर्तपणे निवडणूक लढविण्याची इच्छा प्रकट केली आहे. गणेशोत्सव, गौराईपासून महिलांचा जनसंपर्क वाढला आहे. नवरात्रीच्या कार्यक्रमाच्या नियोजनात महिला मंडळी वॉर्डा वार्डात फिरण्यात व्यस्त आहेत.

आरक्षणाचा मुद्दा ठरणार निर्णायक

राज्य सरकारच्या आरक्षण पद्धतीला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी (दि. 19) फेटाळल्या असून, राज्य सरकारचा गट आणि गणांचे नव्याने आरक्षण काढण्याचा निर्णय वैध असल्याचा निर्वाळा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर नगर परिषद निवडणुकीसाठीही आरक्षण सोडत नव्याने चक्राकार पद्धतीने होणार असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत, असा दावा राजकीय अभ्यासकांनी पुढारी प्रतिनिधीशी बोलताना केला.

नगराध्यक्षपदाची निवडणूक ही परस्परविरोधी नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लावणारी आहे. त्यामुळे विद्यमान आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्यातील कलगीतुरा सोशल मीडियावर चांगलाच रंगला आहे. पत्रकार परिषदांवर परिषदा आणि मिळेल त्या यू-ट्युबवाल्यासमोर या दोन्ही नेत्यांचे सवाल-जवाब सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT