

मनीषा थोरात-पिसाळ
मोशी: चिखली-आकुर्डी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी साने चौक ते चिखलीगाव डीपी रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव आहे. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला. हा डीपी रस्ता पहिल्या टप्प्यात साने चौक ते पिंगळे रोड चोवीस मीटरनुसार विकसित केला जाणार आहे.
मात्र, अजूनही जागा कागदोपत्री ताब्यात नसल्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम रखडलेले आहे. अतिक्रमण काढायला घाई केली तशीच घाई रस्ता रुंदीकरणासाठी करा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (Latest Pimpari chinchwad News)
चिखलीगाव ते साने चौक रस्त्याचा विकास तीन टप्प्यात होणार आहे. त्यामध्ये बारा, अठरा अन् चोवीस मीटर रस्ता असा विकास होणार आहे. पहिला टप्पा नगररचनेच्या डीपीनुसार 30 मीटरचा आहे. मात्र, चोवीस मीटरनुसार काही जागा हस्तांतरित झाल्या आहेत. तसेच नागरिक, व्यापाऱ्यांचीही मागणी चोवीस मीटरनुसार आहे.
त्यामुळे साने चौक ते राधास्वामी सत्संग कॉर्नरपर्यंत हा रस्ता पहिल्या टप्प्यात चोवीस मीटरनुसार विकसित केला जाणार आहे. यामध्ये काही जागा मालकांनी प्रपत्र अ आणि ब द्वारे जागा हस्तांतरीत केल्या आहेत. तर काही जागा कागदोपत्री ताब्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे रुंदीकरणाचे काम रखडलेले आहे.
वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त
साने चौक ते चिखली मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. सकाळी व सायंकाळी येथे सातत्याने वाहतूक कोंडी होते. यामुळे रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे; परंतु महापालिका प्रशासन वेळकाढूपणा करत असल्याने नागरिकांसह वाहनचालक दररोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत.
महापालिकेच्या वतीने 21 जुलै रोजी जागामालकांसाठी शिबिर घेण्यात आले. त्यानुसार, मळेकर कुटुंबीयांकडून प्रपत्र अ आणि ब द्वारे नगररचनाकडे जागा हस्तातंरित केली आहे. इतर जागा मालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यावेळी करण्यात आले होते. मात्र, त्या वेळी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. रस्ता रुंदीकरण झाल्यास वाहतूक कोंडी रोखण्यास मदत होईल. तसेच रस्ते विकास झाला तर परिसराचा विकास लवकर होऊ शकतो त्यामुळे पुढाकार घेतला.
- गणेश मळेकर, स्थानिक.
जागा मालकांनी डीपी रस्त्यासंदर्भातील जागा प्रपत्र अ आणि ब द्वारे नगररचना विभागाला हस्तातंरित केल्यास निविदाप्रक्रियेचे काम पूर्ण केले जाईल. निविदाप्रक्रियेचे काम सुरू आहे.
- शिवाजी चौरे, स्थापत्य विभाग, फ प्रभाग.