Sunetra Pawar  Pudhari
पिंपरी चिंचवड

Sunetra Pawar: पिंपरी-चिंचवडमध्ये सुनेत्रा पवार सक्रिय; दर महिन्याला शहरात येऊन विकासकामांचा घेणार आढावा

महापालिकेत नगरसेवक-पदाधिकाऱ्यांची बैठक; प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आयुक्तांना निर्देश, राष्ट्रवादीच्या संघटन बळकटीवर भर

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: अजिजदादा पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहर अशी राज्यात ओळख आहे. अजितदादांनी शहरासाठी पाहीलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी (दि.२३) पिंपरी-चिंचवड महापालिकेत बैठक घेऊन चर्चा केली. पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी त्यांनी आयुक्तांना निर्देश दिले. यापुढे त्या शहरात दर महिन्यास येणार असून, कामांचा पाठपुरावा करणार आहेत. त्यामुळे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.

महापालिका निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी थेट सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे आरोप करत आरपार की लढाई अशी भूमिका घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्यांदा अपयशाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक अनुभवी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपचे पारडे जड झाले. राष्ट्रवादीला विरोधात बसलावे लागले. पक्षाने महापालिकेत विरोधकांची भूमिका आक्रमकपणे मांडावी, असा सल्ला अजितदादांनी नगरसेवकांना दिला होता. मात्र, २८ जानेवारी २०२६ ला अजितदादांचे अपघाती निधन झाले.

त्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची सुत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडे आली. त्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनंतर पहिल्यांदाच त्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत आल्या होत्या. त्यामुळे महापालिकेत तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये उत्साह संचारला होता. पिंपरी-चिंचवड शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी तसेच, पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची काम व अडचणी सोडण्याबाबात त्यांनी आयुक्तांना स्पष्ट सूचना केल्या. विरोधातील पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे दुर्लक्ष करू नका, असे सांगत त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील कामांत लक्ष घालण्यास लावू नका, असा गर्भित इशारा आयुक्तांसह सत्ताधारी भाजपला दिला आहे.

महिन्यातून एकदा सुनेत्रा पवार या पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. पदाधिकारी व नगरसेवकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दादांच्या पावलावर पाऊल टाकून पिंपरी-चिंचवड शहरात काम करणार असल्याचे सूचित केले आहे. शहरातील कचरा समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू झाल्यानंतर तो पाहण्यासाठी तसेच, कचरा प्रक्रिया केंद्रांचे कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना देणार आहेत. त्यामुळे पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा उत्साह व मनोबल वाढले आहे. महापालिकेतील थांबलेली कामे मार्गी लागतील. कामे करताना प्रशासनाकडून नाहक अडवणूक होणार नाही, असा विश्वास नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, शहरात राष्ट्रवादीचे संघटन अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे, असे आशावाद पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

अजितदादांच्या पिंपरी-चिंचवडमधील विकासाला गती द्यायची आहे

अजितदादांचे पिंपरी-चिंचवड शहराशी जिव्हाळ्याचे व स्नेहाचे नाते होते. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या नुकत्याच आकुर्डी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार म्हटले होते. पिंपरी-चिंचवड आणि अजितदादा असे एक समीकरण आहे. अजितदादांना अपेक्षित असलेले पिंपरी-चिंचवड शहर घडविण्यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे.

विरोधाला विरोध न करता काम करण्याचा सल्ला

पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करताना केवळ विरोधाला विरोध म्हणून काम करू नका. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी महायुतीतील घटक पक्षांशी समन्वयाने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व नगरसेवकांना दिल्या आहेत.

प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या दांडीमुळे राजकीय चर्चेला उधाण

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महापालिकेचे विरोधक्ष पक्षनेते भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे या पहिल्या फळीतील पदाधिकारी व नेत्यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची दांडी हा केवळ योगायोग की त्यामागे काही राजकीय कारण आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रश्नावर उपमुख्यमंत्री पवार यांनी काही पदाधिकारी परदेशी दौऱ्यावर तसेच, घरगुती कारणांमुळे बाहेर असल्याचे सांगितले. त्यांच्या अनुपस्थितीमागे दुसरे कोणतेही कारण नसल्याचा दावा त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT