Animal Cruelty Pudhari
पिंपरी चिंचवड

Animal Cruelty: मोकाट श्वानावर टाकले उकळते पाणी; कामगार भवन परिसरातील हृदयद्रावक घटना

श्वानप्रेमी धावले मदतीला, नेहरूनगर डॉग शेडमध्ये उपचार सुरू, अपुऱ्या उपचारांवर श्वानप्रेमींचा संताप

पुढारी वृत्तसेवा

खराळवाडी: पिंपरी शहरातील नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन परिसरात एका मोकाट श्वानावर अज्ञात व्यक्तीने उकळते पाणी टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या अमानुष प्रकारात श्वान गंभीररीत्या भाजल्याने त्याच्या अंगावरील त्वचा सोलली गेली असून, तो वेदनेने विव्हळत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक श्वानप्रेमींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी श्वानाला सुरक्षित केले. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून श्वानाला नेहरूनगर येथील डॉग शेडमध्ये उपचारासाठी दाखल केले.

सध्या त्याच्यावर उपचार सुरू असले तरी जखमांच्या तीव्रतेच्या तुलनेत अधिक सक्षम आणि सातत्यपूर्ण उपचारांची गरज असल्याचा दावा श्वानप्रेमींनी केला आहे. त्यामुळे उपचारांच्या गुणवत्तेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

प्राणिमित्रांच्या मते, शहरात मुक्या प्राण्यांवर अत्याचाराच्या घटना वाढत असून, दोषींवर कठोर कारवाई होत नसल्याने अशा प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे. या घटनेतील आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नागरिकांची मागणी

  • जखमी श्वानाला तज्ज्ञ पशुवैद्यकीय उपचार द्यावेत.

  • अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी.

  • शहरात प्राण्यांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवावी.

  • डॉग शेडमधील उपचार व्यवस्था अधिक सक्षम करावी.

  • मुक्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र नियंत्रण यंत्रणा उभारावी.

जखमी श्वानाला तातडीने नेहरूनगर डॉग शेडमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी नियमित तपासणी करत असून, आवश्यक ती औषधे व उपचार दिले जात आहेत. श्वानाच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. गरज भासल्यास पुढील उपचारही करण्यात येतील.
- डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.
मुक्या जीवावर गरम पाणी टाकणे हा अत्यंत अमानुष आणि संतापजनक प्रकार आहे. जखमी श्वानाला सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत, त्याच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांनी लक्ष ठेवावे आणि हा प्रकार करणाऱ्या व्यक्तीवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत.
- माया गायकवाड, श्वानप्रेमी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT