वर्षा कांबळे
पिंपरी: गेली पंधरा वर्षांपासून शासनाकडून स्टॅम्प व्हेंडर नियुक्त केले नसल्याने पिंपरी-चिंचवड शहरात स्टॅम्प व्हेंडरची संख्या कमी झाली आहे. परिणामी नागरिकांनी शासकीय कामे करण्यासाठी लागणारे स्टॅम्प पेपर मिळेनासे झाले आहेत. पुणे जिल्ह्यात शंभरऐवजी पाचशे रुपयांचा स्टॅम्प स्वीकारला जात असल्याने नागरिकांना स्टॅम्पसाठी वणवण फिरावे लागत आहे.
वेगवेगळ्या प्रकारचे करारनामे अथवा अन्य प्रकाराची कागदपत्रे करण्यासाठी पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर वापरण्याचे बंधन राज्य सरकारने घातले आहेर; परंतु स्टॅम्प व्हेंडरची संख्या कमी झाल्याने या स्टॅम्पचा बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो जादा दराने विकत घ्यावा लागत आहे. दरम्यान, पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर मिळत नसेल, तर शंभर रुपयांचे पाच स्टॅम्प पेपर वापरून आपले काम करणे शक्य आहे, असे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले आहे. (Latest Pimpri News)
यापूर्वी प्रतिज्ञापत्र, करारनामे आदी कामांसाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा वापर केला जात होता. स्टॅम्प पेपरची किंमत आणि प्रत्यक्षात त्याच्या छपाईसाठी येणारा खर्च पाहता ही किंमत कमी असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे म्हणणे होते.
त्यामुळे या स्टॅम्प पेपरच्या किमतीमध्ये वाढ करावी, असा प्रस्ताव यापूर्वीच विभागाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्यास राज्य सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये मान्यता देत महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात बदल केला. या निर्णयामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरऐवजी प्रत्येक कामासाठी पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाचशे रुपयांच्या स्टॅम्पचा पुरेशा प्रमाणात पुरवठा न झाल्याने तुटवडा निर्माण झाला आहे.
शहराला ट्रेझरी नाही
तालुकास्तरावर पाच लाख लोकसंख्येला प्रत्येक ठिकाणी ट्रेझरी आहे. मात्र, शहराची 30 लाख लोकसंख्या असूनही एकही ट्रेझरी नाही. शहरात ट्रेझरी नसल्याने सर्व स्टॅम्प व्हेंडरला पुण्यात स्टॅम्प भरायला जावे लागते. याठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या रांगा असतात. उदा. स्टॅम्प घेण्यासाठी वेगळी, अर्ज भरण्यासाठी वेगळी, नोटरी इतर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅम्पसाठी अशी खूप मोठी रांग असते. रांगेत उभे राहून संपूर्ण दिवस जातो. यामध्ये पण व्हेंडर स्वत: हजर असायला पाहिजे तिथं दुसरी व्यक्ती चालत नाही.
व्हेंडरची संख्या घटण्याची कारणे
गेल्या पंधरा वर्षांत शासनाकडून नवीन स्टॅम्प व्हेंडरची नियुक्ती करण्यात आलेली नाही. पंधरा वर्षांत आधीचे काही स्टॅम्प व्हेंडर मयत झाले आहेत, तर काहींचा चुकीमुळे परवाना जप्त झाला आहे. तर काहींवर कारवाई झाली यामुळे व्हेंडरची संख्या कमी झाली आहे. जे मयत झाले त्यांच्या वारसांचीदेखील नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवडसारख्या 30 लाख लोकसंख्येला जेवढे कार्यरत स्टॅम्प व्हेंडर आहेत, त्यांच्याकडून स्टॅम्प मिळणे कठीण झाले आहे.
स्टॅम्प व्हेंडर परवाना कोणाला मिळतो
सह जिल्हा निबंधकाकडून व्यक्तीला परवाना मिळतो. मात्र, शासनाने परवाने देणे बंद केले आहे. पिंपरी- चिंचवडसारख्या शहरात स्टॅम्प व्हेंडरची संख्या कमी आहे. शहरातील दिघी आणि चऱ्होली भागात एकही स्टॅम्प व्हेंडर नाही. मोशीमध्ये एकच आहे, भोसरीमध्ये दोनच स्टॅम्प व्हेंडर आहेत.
पुण्यातच फक्त पाचशेचा स्टॅम्प
पुण्याशिवाय इतर ठिकाणी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र चालते. पुणे शहरातच फक्त कोणत्याही कामासाठी पाचशेचा स्टॅम्प पाहिजे. प्रतिज्ञापत्ररसारख्या गोष्टीलादेखील पाचशे रुपयांचा स्टॅम्प कशाला? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
शासनाने 2010 पासून नवीन स्टॅम्प व्हेंडर नेमणे बंद केले आहे. शासनाकडून आता ई - स्टॅम्प उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना घरी बसूनदेखील ऑनलाईन स्टॅम्प भरता येणार आहे. त्यावर काम सुरू आहे. येत्या तीन साडेतीन महिन्यांत ती प्रणाली सुरु होईल.- संतोष हिंगाणे, जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी
ट्रेझरी ऑफिसकडून स्टॅम्प मिळतात आम्ही दर महिन्याला स्टॅम्प आणत असतो. ट्रेझरी अधिकारी आमच्या सोबत असतात. जशी मागणी असते त्याप्रमाणे स्टॅम्पचा पुरवठा केला जातो.- मंगेश खामकर, सह जिल्हा निबंधक