पुणे: मनोरंजनाच्या क्षेत्रात काम करताना स्वतःला जमिनीवर ठेवणे, मानसिक संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या प्रचंड स्पर्धेच्या काळात यश म्हणजे काय, स्वतःची किंमत काय हे ठरवणे गरजेचे असल्याचे असे मत अभिनेत्री श्रिया पिळगावकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवातील पुणे लिट फेस्टमध्ये ‘टू जर्नीज टू लेगसीज - स्टोरीज ॲक्रॉस जनरेशन्स’ या विषयावरील सत्रात ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर, अभिनेत्री श्रिया पिळगावकर यांनी सहभाग घेतला. त्यांच्याशी पराग छापेकर यांनी संवाद साधला. सचिन पिळगावकर यांनी चित्रपटसृष्टीतील त्यांचे अनुभव, आठवणींना उजाळा दिला, श्रिया यांनी त्यांचे अनुभव, चित्रपटसृष्टीतील कार्यरत आई-वडिलांचे मार्गदर्शन याविषयी भाष्य केले.
सचिन पिळगावकर म्हणाले, माझ्या आजवरच्या प्रवासाचे श्रेय माझे दिग्दर्शक, सहकलाकारांना आहे. किती वर्षांची कारकीर्द केली, यापेक्षा काय काम केले हे महत्त्वाचे आहे. आताचा काळ हा लहानांकडून शिकण्याचा आहे. बदल स्वीकारत पुढे जात राहिले पाहिजे. आपल्या कलाकृतींतून लोकांना आनंद द्यायचा प्रयत्न करत राहिलो आहे.
हिंदी चित्रपसृष्टीत तेच तेच काम येत असल्याने दिग्दर्शनाकडे वळलो. श्रिया कधी अभिनेत्री होईल असे वाटले नव्हते. मात्र, तिचे एका नाटकातील काम पाहिल्यावर ती अभिनय करू शकते असे वाटले. तिने तिचे स्थान निर्माण केले आहे, याचा अभिमान वाटतो.
चित्रपट, वेबसीरिजमध्ये हवा समतोल
आताच्या काळात चित्रपट, वेबसीरिज यात समतोल राखणे आवश्यक आहे. अभिनेत्याला नेहमीच स्वतःला शोधत राहावे लागते. सोशल मीडियामध्ये लोकांना इतरांना कमी दाखवायला आवडते. मात्र, आपण आपले काम करत राहणे महत्त्वाचे आहे, असे श्रिया पिळगावकर म्हणाल्या.