सुरक्षारक्षक महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न File Photo
पिंपरी चिंचवड

Security Woman Assault: सुरक्षारक्षक महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने कुणाला काही न सांगण्याची धमकी दिली

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : वाकड येथील एका मॉलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणार्‍या महिलेवर तिच्या वरिष्ठाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने कुणाला काही न सांगण्याची धमकी दिली. ही घटना 10 सप्टेंबर रोजी घडली असून, 15 सप्टेंबर रोजी उघडकीस आली आहे.

याप्रकरणी 21 वर्षीय पीडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मनोज धोंडीराम कदम (45, रा. चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pimpari Chinchwad News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 21 वर्षीय महिला वाकड येथील एका मॉलमध्ये मागील दहा दिवसांपासून सुरक्षारक्षक म्हणून काम करत होती. तिच्यासह मॉलमध्ये 10 पुरुष आणि तीन महिला सुरक्षारक्षक काम करतात. 10 सप्टेंबर रोजी पीडित महिला कामावर गेली.

आरोपी मनोज हा इथे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत होता. त्याने सर्व सुरक्षा रक्षकांना काम वाटून दिले आणि पीडित महिलेला त्याच्यासोबत घेऊन गेला. त्याने पीडितेला टॉवर क्लबमध्ये पाठवले आणि कदम तिच्यासोबत तिथे गेला. तिथे आधीच उपस्थित असलेल्या इतर कर्मचार्‍यांना त्याने बाजूला पाठवले. त्यानंतर आरोपीने पीडितेला बढती आणि पगारवाढीचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. तिने यासाठी नकार दिला असता त्याने तिच्याशी असभ्य वर्तन करण्यास सुरुवात केली.

महिलेने कदम याला मारहाण करून आरडाओरडा करून विरोध केला. मात्र, इथे कोणीही येणार नसल्याचे सांगत त्याने महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घडल्या प्रकारानंतर महिला खाली आली असता सुपरवायजरने तिच्याकडे विचारणा केली. महिलेने घडलेला प्रसंग सुपरवायजर यांना सांगून पतीला बोलावून घेतले.

पोलिसांनी आरोपी कदम याला अटक केली आहे. त्याला हृदयविकाराचा त्रास असल्याने त्याला थेरगाव येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून उपचारानंतर त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे. वाकड पोलिस तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT