Sangvi Water Supply Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Sangvi Water Supply Issue: सांगवीत पाणीटंचाईचा तडाखा; निगडी केंद्रातील बिघाडामुळे नागरिक हैराण

दिवसभर नळ कोरडे; टँकरवर अवलंबित्व, सायंकाळी उशिरा पाणीपुरवठा सुरू

पुढारी वृत्तसेवा

सांगवी: शहराची तहान भागविणाऱ्या निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक बिघाडाचा भीषण तडाखा बुधवारी जुनी आणि नवी सांगवी परिसरातील नागरिकांना बसला. मंगळवारचा शटडाऊन संपल्यानंतर बुधवारी नळाला पाणी येईल, या आशेवर असलेल्या सांगवीकरांच्या पदरी दिवसभर निराशाच पडली. सकाळपासून थेंबभर पाण्यासाठी वणवण केल्यानंतर अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास नळाला पाणी आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, तोपर्यंत सांगवीकरांचे अक्षरशः हाल झाले होते.

पाणी नियोजनाचा फज्जा

सांगवी परिसरातील पाणीपुरवठ्याची धुरा गंगानगर, नायडू आणि पीडब्ल्यूडी या जलकुंभांवर असते. मात्र, रावेत केंद्रातून होणारा पाणीपुरवठाच अत्यंत कमी दाबाने झाल्याने या टाक्या वेळेत भरल्या जाऊ शकल्या नाहीत. याचा परिणाम असा झाला की, जुनी सांगवी आणि नवी सांगवीतील बुधवारी सकाळच्या सत्रात पाण्याचा टिपूसही पडला नाही. उन्हाच्या कडाक्यात पिण्याच्या पाण्यासाठी चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचीच पाण्यासाठी धावपळ सुरू होती.

गृहिणी हतबल

सकाळच्या वेळी कामावर जाण्याची घाई, मुलांची शाळा आणि त्यात घरात पाण्याचा थेंबही नसणे, यामुळे गृहिणींची मोठी धांदल उडाली. दिवसभर पाण्यासाठी जार आणि आरओ प्लांटवर रांगा लावाव्या लागल्या. प्रशासनाने आमचा अंत पाहिला, अशा संतप्त भावना अनेक महिलांनी व्यक्त केल्या. अनेक सोसायट्यांनी हजारो रुपये खर्च करून खासगी टँकर मागवले, ज्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला.

पाचला दिलासा, पण चिंता कायम

दिवसभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर सायंकाळी पाचच्या सुमारास नळाला पाणी आले. जरी पाणी उशिरा आले असले, तरी त्यामुळे दिवसभराचा तणाव काहीसा कमी झाला. मात्र, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जर अशी स्थिती असेल, तर पुढील दिवस कसे जातील, या चिंतेने सांगवीकर ग््राासले आहेत. वारंवार होणाऱ्या या तांत्रिक बिघाडांमुळे प्रशासनाविरुद्ध तीव संताप व्यक्त होत आहे.

आज सकाळपासून घरात पाण्याचा थेंबही नव्हता. अख्खा दिवस पाण्यासाठी वणवण करण्यात गेला. विशेष म्हणजे, गेल्या वेळी जेव्हा पाण्याचा दिवस होता, तेव्हा पाणी तर आले पण नेमकी वीज गुल झाली. वीज नसल्यामुळे आमच्या सोसायट्यांच्या टाक्या भरल्याच गेल्या नाहीत. परिणामी, ते दोन दिवस आणि आजचा हा पूर्ण दिवस, असे सलग तीन दिवस आम्हाला पाण्यासाठी प्रचंड हाल सोसावे लागले आहेत. पर्यायी काल रात्री आणि आज सकाळी टँकर बोलवावं लागला.
चंचल टाक, गृहिणी, सांगवी
निगडी केंद्रातील तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतर यंत्रणा स्थिर होण्यास वेळ लागला. त्यामुळे सांगवीतील काही भागात पाणी पोहोचण्यास विलंब झाला. आम्ही नियोजन पूर्ववत करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत. नागरिकांनी सहकार्य करावे.
साकेत पावरा, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT