उमेश सणस
पिंपळे गुरव: शहरातील रस्त्यांवर महापालिकेच्या वतीने सुशोभीकरण करण्यात येत आहे. परंतु नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येत नाहीत. शहराच्या सुशोभीकरणापेक्षा आमचा जीव वाचवा, अशी आर्त हाक सांगवीतील नागरिकांनी दिली आहे. औंध-रावेत सहा पदरी बीआरटी मार्ग सध्या वाहतुकीसाठी नव्हे तर अपघातांसाठी ओळखला जात आहे. पादचाऱ्यांसाठी हा रस्ता जीवघेणा बनला आहे. यामुळे या मार्गावर पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
नुकताच 20 वर्षीय विद्यार्थी सोहम दीपक व्यास याचा रस्ता ओलांडताना झालेला मृत्यू हा केवळ अपघात नसून, प्रशासकीय निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करत आहेत. वारंवार अपघात घडूनही ठोस उपाययोजना न झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे सांगवी-बोपोडी दरम्यान उभारण्यात आलेल्या पुलासाठी सुमारे 40 ते 50 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, ज्या सांगवी फाट्यावर दररोज हजारो नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागतो. त्या ठिकाणी पादचारी पूल किंवा सुरक्षित भुयारी मार्गाची कोणतीही सोय उपलब्ध नाही. याच ठिकाणी उड्डाणपुलाखाली पालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्चून ओपन जिम, वॉकिंग ट्रॅक, बॅडमिंटन टेबल टेनिस, विरंगुळा केंद्र तसेच योगा शेड अशा सुविधा उभारण्यात आल्या आहेत. मात्र, या सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पांच्या आड मूलभूत सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याची तीव टीका नागरिकांकडून होत आहे. दिसण्यासाठी विकास पण माणसांच्या जीवाची किंमत नाही का? असा संतप्त सवाल आता सर्रास विचारला जात आहे.
सांगवी फाट्याचे भीषण वास्तव
सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव तसेच पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या हजारो नागरिकांची या मार्गावर दररोज मोठी वर्दळ असते. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. संध्याकाळी 5 ते रात्री 11 या वेळेत खासगी वाहनांचे अनधिकृत थांबे आणि प्रवाशांची गर्दी यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे. सिग्नल यंत्रणा, झेबा क्रॉसिंग आणि प्रभावी वाहतूक नियंत्रणाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो. कॉलेजचे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना दररोज जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.
‘अपघात’ की व्यवस्थेचे अपयश?
सोहम व्यासचा मृत्यू हा केवळ एक आकडा नसून, व्यवस्थेच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. आणखी किती निष्पाप जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार? असा संतप्त सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.
बॅरिकेड्स की अडथळ्यांची भिंत
स्त्याच्या मधोमध उभारलेले बॅरिकेड्स सुरक्षेसाठी लावले असले तरी तेच आता नागरिकांसाठी अडथळ्यांची भिंत ठरत आहेत. रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना हे बॅरिकेड्स चढून-उतरून मार्ग काढावा लागतो. याच वेळी वेगाने धावणारी वाहने अपघाताला आमंत्रण देत असल्याने परिस्थिती अधिकच धोकादायक बनली आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
सांगवी फाट्यावर तातडीने ठोस उपाययोजना करा.
तत्काळ पादचारी पूल किंवा सुरक्षित भुयारी मार्ग उभारावा.
तोपर्यंत सिग्नल व झेबा क्रॉसिंगची व्यवस्था करावी.
ट्रॅफिक पोलिस कायमस्वरूपी तैनात करून वेगमर्यादा काटेकोरपणे अंमलात आणावी.
अपघातप्रवण ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
प्रशासनाने केवळ औपचारिक पाहण्या आणि पोकळ आश्वासनांपलीकडे जाऊन ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा नागरिकांचा वाढता संताप रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता चेंडू महापालिका आणि वाहतूक विभागाच्या कोर्टात आहे. वेळीच निर्णय होणार का की आणखी एका दुर्घटनेची वाट पाहिली जाणार?
सांगवी फाटा येथे भुयारी मार्ग किंवा स्काय ऑफ उभारण्याबाबत वाहतूक विभागाकडून तांत्रिक अभिप्राय मागविण्यात आला आहे. त्याबाबतचा पाठपुरावा सध्या प्रगतिपथावर आहे. सदर अभिप्राय प्राप्त होताच तात्काळ सल्लागार नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला गती देण्यात येईल.प्रेरणा सिनकर, प्रकल्प विभाग, सह शहर अभियंता, मनपा
सांगवी फाट्यावर रस्ता ओलांडणे म्हणजे रोज मृत्यूशी झुंज आहे. सिग्नल यंत्रणा, झेबा क्रॉसिंग यांचा अभाव असल्याने नागरिकांसाठी कोणतीच सुरक्षित व्यवस्था नाही. उड्डाण पुलाखाली कोट्यवधी रुपये खर्च करून जिम, वॉकिंग ट्रॅक सर्वकाही केले पण नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक पादचारी पूल नाही हा कसला विकास.धम्मरत्न गायकवाड, युवक शहराध्यक्ष, आरपीआय आठवले