सांगवी: राज्यात सध्या सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांच्या वर पोहोचला आहे. या कडाक्याच्या उन्हाचा थेट परिणाम आता नागरिकांच्या आरोग्यावर, विशेषतः किडनीवर होऊ लागला आहे. द लॅन्सेटच्या अहवालानुसार वाढत्या उष्णतेचा संबंध थेट किडनीच्या विकारांशी जोडला गेला असून, सांगवीत मूतखडा आणि मूत्रमार्गातील संसर्गाच्या रुग्णांमध्ये 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे.
जेव्हा शरीरातील पाण्याचे प्रमाण घामावाटे कमी होते, तेव्हा लघवीचे प्रमाण घटून ती अधिक गडद होते. वैद्यकीय भाषेत सांगायचे तर, शरीरातील कॅल्शियम ऑक्सलेट आणि युरिक ॲसिडची एकाग््राता वाढल्यामुळे त्यांचे स्फटिकात रूपांतर होते. या मिनरल सुपरसॅच्युरेशन प्रक्रियेमुळेच मूतखड्याचा त्रास बळावतो.
नैसर्गिक पेयांवर भर: शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स टिकवून ठेवण्यासाठी लिंबू सरबत, ताक, शहाळ्याचे पाणी आणि कोकम सरबत यांसारख्या नैसर्गिक पेयांना प्राधान्य द्या.
आहारातील बदल: आहारात मिठाचे (सोडियम) प्रमाण कमी करा. जास्त प्रमाणात मांसाहार किंवा प्रोटिन सप्लिमेंट घेतल्यास किडनीवर ताण येतो, त्यामुळे उन्हाळ्यात हलका आहार घ्या.
पेनकिलर्स: डोकेदुखी किंवा अंगदुखीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर्स घेणे किडनीसाठी घातक ठरू शकते.
किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी हेल्थ मंत्र
पाण्याचे गणित पाळा : फक्त तहान लागल्यावरच नाही, तर नियमित अंतराने पाणी प्या. दिवसाला किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. जेणेकरून शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील.
काय टाळणे हितकारक?
व्यसने व कॅफिन : चहा, कॉफी आणि मद्यपानामुळे लघवीवाटे शरीरातील पाणी जास्त बाहेर पडते, ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो.
वेळेचे नियोजन
दुपारी 12 ते 4 या वेळेत थेट उन्हात जाणे टाळा. लघवी रोखून धरू नका, कारण यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असते.
ही लक्षणे दिसल्यास सावधान!
कंबरेच्या एका बाजूला किंवा ओटीपोटात तीव कळा येणे.
लघवी करताना जळजळ होणे किंवा लघवीतून रक्त येणे.
लघवीचा रंग गडद पिवळा किंवा लालसर होणे.
थंडी वाजून ताप येणे आणि मळमळणे.
सांगवी परिसरात उन्हाची तीवता पाहता मूतखड्याच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसत आहे. लघवीचा रंग तुमच्या आरोग्याचा आरसा आहे. जर लघवी पांढरी किंवा फिकट पिवळी असेल तर तुमची किडनी सुरक्षित आहे, पण रंग गडद असेल तर तातडीने पाण्याचे प्रमाण वाढवा.डॉ. अनुजा माकन, मूत्रपिंडविकार तज्ज्ञ.