Sangvi Flood Problem Pudhari
पिंपरी चिंचवड

Sangvi Flood Problem: सांगवीकरांचा संताप! दरवर्षीच्या पुरातून कायमस्वरूपी मुक्तीची मागणी; तात्पुरत्या उपायांना नागरिकांचा नकार

मुळा-पवना नदीच्या पुरामुळे वारंवार फटका; अतिक्रमण हटवा, नदी रुंदीकरण करा, अशी प्रशासनाकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

सांगवी: मुळा-पवना नद्यांच्या पुरामुळे दरवर्षी सांगवी (जुनी आणि नवी) परिसराला जे ग्रहण लागते, ते आता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे. दरवर्षी पुराचे पाणी घरात शिरणे, संसार उद्ध्वस्त होणे आणि त्यानंतर प्रशासनाने दिलेली तात्पुरती मदत स्वीकारून पुन्हा जैसे थे परिस्थितीत जगणे, हे आता सांगवीकरांना मंजूर नाही. पुराच्या या संकटावर आता केवळ मलमपट्टी नको, तर 'कायमस्वरूपी आणि ठोस उपाययोजना' हवी, अशी स्पष्ट भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे.

अतिक्रमणांमुळे पुराला आमंत्रण

नदीपात्रातील अनधिकृत बांधकामे हा सांगवीकरांसाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय बनला आहे. प्रशासनाने नदीपात्रासाठी 'ब्लू लाईन' आणि 'रेड लाईन' निश्चित केली असली, तरी प्रत्यक्षात त्यावर कोणतीही ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही. नदीपात्रात झालेली अनधिकृत बांधकामे आणि वाढलेली अतिक्रमणे यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे बाधित झाला आहे. ही अतिक्रमणे हटविण्यात प्रशासनाला आलेले अपयशच नागरिकांच्या आयुष्याशी खेळत असल्याचे चित्र आहे. केवळ नियम कागदावर राहून उपयोग नाही, तर प्रत्यक्ष कारवाईची गरज आहे.

प्रशासनाच्या कृतीची प्रतीक्षा

सांगवीकरांना आता हक्काचे, सुरक्षित आणि पुराच्या संकटापासून मुक्त असे आयुष्य हवे आहे. ही वेळ केवळ मदतीची नाही, तर 'ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजनांची' आहे. आता महापालिका प्रशासन यावर काय ठोस कृती करते, याकडे संपूर्ण सांगवीकरांचे लक्ष लागले आहे.

तात्पुरती निवारा व्यवस्था

पुराचा फटका बसलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून निवारा केंद्रांची सोय करण्यात आली होती. यामध्ये ४६१ पूरग्रस्तांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अहिल्याबाई होळकर शाळेत, तर ४१ नागरिकांची व्यवस्था नरसिंह विद्यालयात करण्यात आली. याच ठिकाणी या पूरग्रस्तांना जेवणाचीदेखील व्यवस्था केली आहे.

१५ तास अंधार

पुराच्या अतिरेकामुळे मुळानगर, मधुबन आणि प्रियदर्शनीनगर या भागांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. सुरक्षेच्या कारणास्तव या भागांचा वीजपुरवठा सोमवारी दुपारी साडेचार वाजता खंडित करण्यात आला होता. तब्बल १५ तास अंधारात राहिल्यानंतर, मंगळवारी सकाळी साडेसात वाजता हा वीजपुरवठा पूर्ववत झाला.

प्रशासनासमोरील आव्हाने..

  • नदीपात्राचे अतिक्रमण निर्मूलन : ब्लू लाईन आणि रेड लाईनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कारवाई करणे.

  • गाळ आणि रुंदीकरण : नदीची पाणी साठवण्याची क्षमता वाढवण्यासाठी गाळ काढण्याची प्रक्रिया दरवर्षी राबवणे.

  • स्ट्रॉर्म वॉटर, ड्रेनेज सिस्टीम : पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी स्वतंत्र आणि आधुनिक यंत्रणा उभारणे, जेणेकरून ड्रेनेजचे पाणी पुन्हा वस्त्यांत येणार नाही.

  • संरक्षक भिंत, घाट : नदीकाठच्या वस्त्या सुरक्षित ठेवण्यासाठी नदीला संरक्षक भिंत उंच करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT