Construction Safety Issues Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Construction Safety Issues: पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामांचा वेग; मात्र सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष

मेट्रो, महामार्ग आणि पदपथ कामांदरम्यान नागरिकांच्या जीवाशी खेळ; उडणारी धूळ, लटकलेल्या सळ्या आणि बॅरिकेड्सचा अभाव

पुढारी वृत्तसेवा

बजरंग मासाळ

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात एका बाजूला मेट्रोचे खांब उभे राहत आहेत, महामार्ग रुंदावले जात आहेत, पदपथ नव्याने तयार केले जात आहेत. तर, दुसऱ्या बाजूला खासगी बांधकामांची स्पर्धा सुरू आहे. मात्र, या विकासाच्या वेगामध्ये सुरक्षेचे नियम कोठेतरी मागे पडल्याचे चित्र शहरभर दिसून येत आहे. प्रमुख रस्ते, बीआरटी कॉरिडॉर, मेट्रो मार्ग आणि बांधकाम स्थळांची पाहणी केली असता नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे.

सुरक्षा भिंत की अपघाताची किनार?

नाशिक फाटा ते पिंपरी चौक आणि पुढे निगडी महामार्गापर्यंत मेट्रो कामासाठी पत्र्यांची सुरक्षा भिंत उभारण्यात आली आहे. मात्र, हे पत्रे अनेक ठिकाणी वाकलेली, कोलमडलेली तर काही ठिकाणी पूर्णपणे गायब दिसले. काही पत्रे मागेपुढे बसविल्याने वाहन चालविताना अचानक पत्रा समोर येणे व अंदाज चुकून पत्रा वहानांस लागण्याचा धोका निर्माण होत आहे. अरुंद झालेल्या रस्त्यावरुन वाहनचालकांना अक्षरशः कसरत करत मार्ग काढावा लागत आहे.

उडणाऱ्या धुळीने नागरिक त्रस्त

बांधकाम सुरू असलेल्या अनेक ठिकाणी सुरक्षा जाळ्या लावण्यात आल्या आहेत. मात्र, त्या केवळ औपचारिकता म्हणून उभारल्या की काय, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. काही जाळ्या फाटलेल्या, काही अर्धवट लटकलेल्या तर काही ठिकाणी पूर्णपणे खुल्या दिसल्या. त्यातून उडणारी सिमेंटयुक्त धूळ थेट नागरिकांच्या अंगावर पडत असल्याचे दिसून आले.

लोखंडी सळ्यांच्या सावटाखाली प्रवासी

चिंचवड स्टेशन चौक परिसरात मेट्रोच्या उभारण्यात आलेल्या पिलरवर मोठंमोठे लोखंडी सांगाडे बसवण्यात आले आहेत. काही ठिकाणी सळ्या हवेत लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्या. विशेष म्हणजे त्याच पिलरखाली निगडीकडे जाणारे प्रवासी उभे राहत असल्याचे दिसून आले. अचानक वाऱ्याचा जोर वाढला किंवा एखादी सळई निखळली तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महामार्गावरच सुरू बेफिकीर काम

आकुर्डी तुळजाभवानी रोडलगत चिंचवड ते निगडी दरम्यान पदपथाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी ट्रक रस्त्यात आडवे उभे करून क्रेनच्या साहाय्याने ब्लॉक उतरवले जात होते. जेसीबी आणि पोकलेनद्वारे माती, खडक आणि तुटके ब्लॉक थेट लॉरीमध्ये भरले जात होते. मात्र, या संपूर्ण कामादरम्यान ना बॅरिकेड्स, ना सूचना फलक, ना वाहतूक नियंत्रण केली जात असल्याचे दिसून आले. उडणारी धूळ, विटांचे तुकडे, खडी आणि पालापाचोळा थेट वाहनचालक व पादचाऱ्यांच्या अंगावर पडत होता. काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

या हव्यात उपाययोजना

  • प्रत्येक बांधकामस्थळी मजबूत सुरक्षा जाळ्या अनिवार्य

  • महामार्गावरील कामांवेळी बॅरिकेड्स व रिफ्लेक्टर सक्तीचे

  • धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षा ऑडिट करणे गरजेचे

  • कामगारांसाठी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट अनिवार्य

  • धूळ नियंत्रणासाठी नियमित पाण्याची फवारणी

  • प्रत्येक प्रकल्पस्थळी जबाबदार अधिकाऱ्यांची उपस्थिती

  • नियम मोडणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई

  • नागरिकांसाठी चेतावणी फलक व पर्यायी मार्ग व्यवस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT