पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या विविध विभाग तसेच खासगी कंपन्यांकडून केले जाणारे रस्ते खोदकाम 15 मे रोजीपासून बंद करण्याचे आदेश आहेत. तसे असतानाही शहरात काही ठिकाणी बिनभोबाट रस्ते खोदले जात आहेत. खोदाईमुळे पावसामध्ये रस्त्यांची दुरवस्था होऊन अपघातांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महापालिकेचे स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, ड्रेनेज तसेच, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी, नेटवर्किंगच्या खासगी कंपन्या, महावितरण, एमएनजीएल व इतर सरकारी विभाग विविध सेवावाहिन्या आणि केबल टाकण्यासाठी रस्ते व पदपथ खोदतात. खोदकाम करुन भूमिगत सेवाहिनी किंवा केबल टाकली जाते. खोदकामानंतर व्यवस्थित दुरुस्ती न केल्याने पावसाळ्यात खड्डे पडतात. तसेच, पावसाच्या तोंडावर खोदकाम केल्याने रस्ते खराब होऊन खड्ड्याचे प्रमाण वाढते. त्यासाठी खोदाई धोरणाप्रमाणे 15 मे रोजीनंतर शहरात खोदकाम करू नये. तसे केल्यास दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महापालिकेच्या स्थापत्य विभागाने दिला होता. मात्र, तो नियम पाळला जात नाही.
शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. भोसरीतील वायसीएम रुग्णालय ते लांडेवाडी रस्त्यावर एमआयडीसी चौकात केबल टाकण्यासाठी पदपथ खोदल्याचा प्रकार सोमवारी (दि. 19) निदर्शनास आला आहे. महापालिकेने तातडीने ही खोदाई थांबविली. तसेच, निगडी ते दापोडी मार्गावर अर्बन स्ट्रीट डिजाईनचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ते व पदपथ खोदून ठेवण्यात आले आहेत. तसेच, डांबरी रस्ते खरडून घेण्यात आले आहेत. त्यामुळे वाहने विशेषत: दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सीसीटीव्ही कॅमेर्यासाठी तसेच, अर्बन स्ट्रीट डिजाईनच्या पदपथावर विद्युत दिवे लावण्यासाठी वीजपुरवठा घेण्यासाठी रस्ते खोदण्यात येत आहेत. निगडी ते किवळे मार्गावर बीआरटीचे बॅरिकेटस बसविण्यासाठी खोदकाम सुरू आहे. मात्र, यावरून शहरात 15 मे रोजीनंतरही रस्ते खोदकाम सुरु असल्याचे समोर आले आहे. इतरही ठिकाणी रस्ते खोदले जात असून, खोदलेले चर बुजविलेले गेलेले नाहीत. त्यामुळे पावसात शहराती रस्त्यांची दुरवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लहान-मोठे अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहरात पिंपरी ते निगडीच्या भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक असे 4.5 किलोमीटर अंतराच्या मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी सर्व्हिस रस्ता खोदण्यात येत आहे. ते काम सध्याही सुरूच आहे. पावसात काम केले जात असल्याने गेल्या मंगळवारी (दि. 13) रात्री साडेअकराच्या सुमारास पिलरसाठी उभारलेल्या लोखंडी गजाचा सांगडा कोसळला होता. मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडीची समस्या गंभीर झाली असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. तसेच, पिंपरी येथे स्टेशनच्या चौथ्या जिन्यासाठी बीआरटी मार्गात काम सुरू आहे. नाशिक फाटा स्टेशनखालीही काम सुरू आहे.
शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या आठवड्याभरापासून तो कमी जास्त प्रमाणात बरसत आहे. त्यामुळे रस्त्यावर खोदकाम केलेल्या ठिकाणी पावसाचे पाणी साचत आहे. त्या खड्ड्यात पडून वाहनचालक किंवा पादचार्यांचा अपघात होण्याचा धोका वाढला आहे. तसेच, त्या पाण्यात वीज उतरून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पिंपरी गावात वीजेचा शॉक लागून एका गाईचा मृत्यू झाला होता. अशी घटना घडण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.