अहो, ड्रायव्हर काका.. काही करा, पण बस गावातून आणा!  File Photo
पिंपरी चिंचवड

PMPML bus service: अहो, ड्रायव्हर काका.. काही करा, पण बस गावातून आणा!

वडगाव शहरातील विद्यार्थ्यांसह नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: गेल्या काही वर्षांपासून वडगाव शहरातून जाणारी पीएमपी बस गावातून न जाता महामार्गाने जात असल्याने शहराच्या कानाकोपर्‍यातून बससाठी येणार्‍या नागरिक, विद्यार्थ्यांना पायपीट करत महामार्गावर जावे लागत आहे. त्यामुळे बससेवा पूर्वीप्रमाणे गावातूनच सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. शालेय विद्यार्थी तर अहो, ड्रायव्हर काका.. काही करा, पण बस गावातूनच आणा, अशी विनंती करू लागले आहेत.

मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरापासून निगडी, कात्रजपर्यंत बससेवा अनेक वर्षांपासून सुरू आहे. पूर्वी बस शहरातील मुख्य रस्त्यानेच जात होती, परंतु कालांतराने मुख्य बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त पार्किंग, सतत होणारी वाहतूनकोंडी यामुळे बस शहराच्या बाहेरून जाणार्‍या मुंबई-पुणे महामार्गाने जाऊ लागल्या, त्या आजतागायत त्याच मार्गाने जात आहेत. (Latest Pimpri News)

दरम्यान, शहरातील केशवनगर, म्हाळसकरवाडी, छत्रपती संभाजी महाराजनगर, खंडोबा मंदिर परिसर, गावठाण भागातील ढोरेवाडा, चव्हाणवाडा आदी रहिवाशी भाग हा महामार्गापासून लांब अंतरावर आहे. हा रहदारीचा परिसर असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात कामगारवर्ग वास्तव्यास आहे.

परिणामी नागरी वस्ती मोठी असल्याने विद्यार्थांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या भागातील कामगार, विद्यार्थी, महिला यांना बसने जाण्यासाठी मुख्य स्टॉप असलेल्या महादजी शिंदे स्मारकाजवळ किंवा मातोश्री हॉस्पिटलजवळ अथवा पूर्वेकडील स्वागत कमानीजवळ पायपीट करत जावे लागते. त्यात काही कारणास्तव घरातून उशीर झाला तर वेळप्रसंगी पळत पळत बस पकडावी लागते. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी पीएमपी बससेवा पूर्वीप्रमाणे शहरातील मुख्य रस्त्यानेच करावी, अशी मागणी होत आहे.

अस्ताव्यस्त पार्किंगला बसेल आळा

दरम्यान, अस्ताव्यस्त पार्किंग, वाहतूककोंडी यामुळे बससेवा महामार्गाने सुरू झाली आहे, परंतु शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रीटीकरण नुकतेच झाले असले तरी रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केलेली वाहने, दुकानदारांनी रस्त्यावर ठेवलेल्या वस्तू, दुकानांसमोर ग्राहकांच्या लावलेली वाहने यामुळे वाहतूक कोंडींचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. बससेवा पुन्हा गावातून सुरू केली तर अस्ताव्यस्त पार्किंगला आळा बसू शकतो, पर्यायाने वाहतूक कोंडीही टळू शकते.

वडगाव शहराच्या बाहेरून जाणारी बस तळेगाव स्टेशन, तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक अशा वर्दळीच्या मार्गाने जाते. ही वर्दळ वडगाव शहरापेक्षा मोठ्या प्रमाणात असते. तरीही बस त्याच रस्त्याने जाते, मग वडगाव शहरातून जायलाच काय अडचण आहे. किमान पुण्याकडे जाताना बस मुख्य रस्त्याने न्यावी, तसेच गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी महामार्गानेच नेली तर वाहतूक कोंडीचा प्रश्न येणार नाही.
- पंढरीनाथ ढोरे, वरिष्ठ उपाध्यक्ष, राष्ट्रवादी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT